Newasa Assembly Election : आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघातील निकालही आता समोर झाला आहे. येथून महायुतीचे विठ्ठल वकीलराव लंघे पाटील विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे शंकरराव गडाख यांचा पराभव झाला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठल वकीलराव लंघे पाटील यांना 95 हजार 444 मते मिळालीत तर ठाकरे गटाचे शंकरराव गडाख यांना 91 हजार 423 मते मिळालीत. अर्थातच लंघे पाटील 4 हजार 21 मतांनी निवडणूक जिंकलेत.
प्रहार जनशक्ती पार्टीचे बाळासाहेब मुरकुटे यांना 35 हजार 331 मते मिळालीत. खरेतर शंकरराव गडाख हे काही राऊंड मध्ये पुढे होते मात्र विठ्ठल वकीलराव लंघे पाटील यांनी नंतर आघाडी घेतली आणि ही निवडणूक जिंकली.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या निवडणुकीत अर्थातच 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालात नेवासाची जागा शंकरराव यशवंतराव गडाख यांनी जिंकली होती. त्यावेळी नेवासा मतदारसंघात विजय-पराजयाचे अंतर ३०६६३ इतके होते.
गत निवडणुकीत गडाख यांनी भाजपा उमेदवार बाळासाहेब उर्फ दादासाहेब दामोधर मुरकुटे यांचा पराभव केला होता. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात अहिल्यानगर जिल्ह्यात मोठे यश मिळाले होते. अहिल्यानगर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ या त्या दोन जागा आणि या दोन्ही जागांवर लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेत. यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीला नगर जिल्ह्यात चांगले यश मिळणार अशी आशा आघाडीला होती.
मात्र आघाडीच्या अपेक्षेप्रमाणे हा निकाल राहिला नाही. या निवडणुकीत जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे अनेक मातब्बर नेते पराभूत झाले आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सुद्धा पराभूत झालेत.
संगमनेर हा थोरात यांचा बालेकिल्ला. त्यांनी 40 वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र या निवडणुकीत थोरात यांना मोठा फटका बसला असून शिंदे गटाचे अमोल खताळ संगमनेर मधून विजयी झाले आहेत.