पक्षप्रवेशाचा नुसता गोंधळ आणि चर्चा फक्त लंकेंची ! निलेश लंके यांच्या मनात आहे तरी काय ?

Nilesh Lanke News : गेल्या काही दिवसांपासून पारनेरचे आमदार निलेश लंके हे अजितदादा यांच्या गटाला सोडचिट्टी देतील आणि शरद पवार यांच्या गटात सहभागी होतील अशा चर्चा सुरू आहेत. मात्र या चर्चांना आज पूर्णविराम लागेल आणि निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात येथील असे जवळपास नक्की झाले होते.

विशेष म्हणजे शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत निलेश लंके यांचे स्वागत देखील केले. मात्र निलेश लंके यांनी अजित पवार यांच्या गटाला सोडचिट्टी दिली आहे का ? ते शरद पवार यांच्या गटात सामील झाले आहेत का? या प्रश्नांची उत्तरे अजूनही गुलदस्त्यातच आहेत.

निलेश लंके यांनी लिहिलेले मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचे आज शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन पूर्ण झाले आहे. मात्र निलेश लंके यांचा पक्षप्रवेश हा खऱ्या अर्थाने अपुरा राहिला आहे.

कारण की आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवार आणि निलेश लंके या दोन्ही नेत्यांनी लंके यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिली आहे का ? या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय ? हे समजणं आता कठीण होऊन बसलं आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी आपल्या भेटीत राजकारणाची चर्चाच झाली नसल्याचे आजच्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

यामुळे नेमके निलेश लंके हे अजितदादांसोबत आहेत की शरद पवार यांच्या गटात सामील झाले आहेत हे अजूनही उमगलेले नाही. दरम्यान निलेश लंके यांनी “विचारधारा आणि पक्ष एकच आहे.

मी शरद पवारांना कधी सोडलं नाही. माझ्या प्रत्येक कामात शरद पवार यांचा फोटो आहे. शरद पवार आमच्या हृदयात आहेत. खासदारकी आणि कुठल्या निवडणुकीबाबत आमची चर्चा झाली नाही”, असं म्हटले आहे.

तसेच, “आज मी पुस्तक प्रकाशनासाठी आलेलो आहे. माझी अजित पवारांशी पक्ष सोडण्याबाबत प्रत्यक्ष चर्चाच नाही. त्या गोष्टीवर निष्फळ बोलण्यात अर्थ नाही. मी खासरकीतला सर्वात छोटा घटक आहे.

वरिष्ठ असताना आपण शांत राहणं याला सुसंस्कृतपणा म्हणतात. आमच्या सर्वांचे सर्वस्व शरद पवार आहेत. शरद पवार सांगतील तोच आदेश मानेल. आम्ही विचारधारा सोडलेली नाही”, असं सुद्धा आमदार निलेश लंके यांनी यावेळी म्हटले आहे.