सुजय विखे यांच्या माफीनाम्यावर निलेश लंके म्हणाले, ‘आज तुम्हाला माफी मागण्याची वेळ येत आहे, याचा अर्थ……’

Nilesh Lanke On Sujay Vikhe Patil News

Nilesh Lanke On Sujay Vikhe Patil News : भारतीय जनता पक्षाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या अधिकृत उमेदवारांची दुसरी यादी नुकत्याच काही दिवसांपूर्वी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे होती. यात सुजय विखे यांचे नाव देखील होते. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा नगर दक्षिणचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी बहाल करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.

विशेष म्हणजे उमेदवारी बहाल झाल्यानंतर खासदार महोदय यांनी पुन्हा एकदा नगर दक्षिणचा गड काबीज करण्यासाठी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. दरम्यान, सुजय विखे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर काल नगर भाजपाची आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली.

या पक्षाच्या आढावा बैठकीत मात्र सुजय विखे यांच्या माफीनाम्याची मोठी चर्चा पाहायला मिळाली. कालच्या पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांसमोर त्यांनी जाहीर माफीनामा सादर केला. सुजय विखे यांनी माफीनामा सादर करताना असे म्हटले की, ‘यंदा निवडणुकीच तिकीट मला जरी मिळालं असलं, तरी गेल्या ५ वर्षाचा काळ हा खडतर काळ होता, या काळात कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी माफी मागतो.’

खासदार महोदय यांनी अचानक पक्ष कार्यकर्त्यांसमोर माफीनामा सादर केल्यामुळे तेथे उपस्थित पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते सुद्धा अवाक झालेत. दुसरीकडे, राजकीय विश्लेषकांनी सुजय विखे यांनी पक्ष कार्यकर्त्यांची माफी मागून मोठी राजकीय खेळी खेळली असल्याचे मत व्यक्त केले आहे. खरेतर गेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील हे काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेत.

त्यांना भाजपाने तिकीट दिले आणि ते निवडूनही आलेत. नंतर त्यांचे वडील अर्थातच राज्याचे सध्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील भाजपवासी झालेत. या दोन्ही पिता-पुत्रांच्या एंट्रीमुळे मात्र नगर भाजपा मधील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनाला ठेच लागली.

अनेकांनी त्यांच्या या प्रवेशावर नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे विखे यांची भाजपामध्ये एन्ट्री होताच नगरमध्ये भाजपाला विधानसभा निवडणुकीत मोठा झटका बसला. विधानसभा निवडणुकीत भाजपाला नगर जिल्ह्यात मोठी हानी झाली आणि याचे खापर विखे यांच्यावर फोडले गेले.

भाजपाचे नगरमधील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आणि पराभूत उमेदवारांनी त्यावेळी विखे यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रारही केली. त्यामध्ये राम शिंदे यांचाही समावेश होता. तेव्हापासून राम शिंदे तथा नगर भाजपामधील अनेक निष्ठावंत कार्यकर्ते विखे यांच्यावर नाराज आहेत.

विधानपरिषद आमदार राम शिंदे, युवा नेते विवेक कोल्हे असे अनेक नेते विखे यांच्यावर नाराज असून हीच नाराजी दूर करण्यासाठी सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची माफी मागितली असल्याचे मत राजकारणातील जाणकार लोकांनी मांडले आहे.

मात्र सुजय विखे यांच्या या जाहीर माफीनाम्यावर नगर दक्षिण मधून यंदा होऊ घातलेली लोकसभा लढवू इच्छिणारे नीलेश लंके यांनी खोचक टीका केली आहे. निलेश लंके यांनी विखे यांच्यावर टीका करताना असे म्हटले की, “आज तुम्हाला माफी मागण्याची वेळ येत आहे. याचा अर्थ तुमचा राजकीय स्वार्थ भागला आहे. आता परत तुम्ही आहे त्या स्थितीत कार्यकर्त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करणार आहात.”

तसेच याच संदर्भात पुढे बोलताना त्यांनी “माझे सुज्ञ नागरिकांना सांगणे आहे की, ही माफी फक्त आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी असून आपला स्वार्थ भागल्यानंतर परत आपल्या कार्यकर्त्यांचा बदला घेतल्याशिवाय सोडत नसतात. हा प्रत्येक माणसाचा स्वभाव गुण असतो. त्यामुळे सुज्ञ नागरिकांनी या गोष्टी पाहिल्या पाहिजेत,” अशी टिका केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe