कॅलिफोर्नियाचे रहिवासी टीम फ्रिडे यांना सर्पतज्ज्ञ म्हणून ओळखले जाते. टिम फ्रिडेला सरपटणारे प्राणी आणि इतर विषारी प्राण्यांचे पूर्वीपासून आकर्षण आहे. विस्कॉन्सिनमधील त्याच्या घरी, तो छंद म्हणून विंचू आणि कोळी यांचे विष काढत असे. एवढेच नाही तर त्याने डझनभर सापही पाळले आहेत. त्यांनी गेल्या 18 वर्षांत स्वतःला अनेकदा सापांकडून चावून घेतले. आता त्यांनी सर्पदंशावर स्वतः एक लस तयार केल्याचा दावाही केला आहे.
सर्व सापांना घ्यायला लावला चावा
टीम फ्रिडे यांनी गेली 18 वर्षे सापांसोबत घालवले. या कालावधीत त्यांनी या जगातील विविध प्रजातींच्या विषारी सापांच्या विषाचे प्रयोग स्वतःवर केले. कधी ते या सापांच्या विषाचे इंजेक्शन स्वतःला लावून घेत असत तर कधी स्वतः सापांना चावायला लावत असतं. या विषानंतर त्यांनी स्वतःच्या शरीरात होणाऱ्या बदलांच्या नोंदी ठेवल्या. याच नोंदीच्या आधारे त्यांनी सापांवर अँन्टीबाँडीज तयार केल्याचा दावा केला आहे.

काय आहे दावा
कोणताही साप चावला तर तुमचे शरीर त्याचा प्रतिकार करते. विष सामान्य असेल तर शरीर त्याला लगेच प्रतिरोध करते. हे विष यापूर्वीही शरीरात आले असेल तर त्यांच्या अँन्टीबाँडीच शरीरात सक्रीय असतात. त्याच ते विष निष्क्रिय करतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सापाच्या विषाच्या विषारी पदार्थांचा सामना करते. या स्थितीत, रोगप्रतिकारक शक्ती शरीरात विष निष्क्रिय करणारे अँटीबॉडीज तयार करण्यास सुरुवात करते, असा दावा फ्रिडे यांनी केला.
दोन दशके केला प्रयोग
फ्रीडे यांनी जवळजवळ दोन दशके साप चावणे आणि विषारी इंजेक्शन्स घेण्याचा प्रयोग केला. आजही त्याच्याकडे फक्त विषाने भरलेला फ्रिज आहे. तो त्याच्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करतो. त्यामध्ये त्याने ब्लॅक मांबा, तैपन आणि वॉटर कोब्राच्या चाव्यामुळे त्याच्या हातावर सूज आणि खुणा दाखवल्या आहेत. “मला माझ्या मर्यादा मूर्च्छेत राहण्यापासून शक्य तितक्या मृत्यूच्या जवळ न्यायच्या होत्या आणि मग तिथून परत यायचे होते,” असे फ्रिडे यांनी सांगितले.
विषावर औषध तयार केल्याचा दावा
विषावर अँटीवेनम किंवा उतारा बनवणे कठीण आणि महागडे आहे. हे सहसा घोड्यांसारख्या मोठ्या सस्तन प्राण्यांमध्ये विष टोचून आणि नंतर त्यांच्यापासून तयार झालेले अँटीबॉडीज गोळा करून बनवले जाते. अशा अँटीवेनम्स सामान्यतः फक्त काही विशिष्ट प्रजातींच्या सापांविरुद्ध प्रभावी असतात. शिवाय, कधीकधी ते वाईट प्रतिक्रियांना जन्म देतात कारण ते मानवी उत्पत्तीचे नसतात. परंतु आता फ्रिडे यांनी स्वतःच्या शरीरात या अँण्टीबाँडीज तयार केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या रक्ताचा आभ्यास करुन विषावर चांगले औषध तयार होऊ शकते, असा त्यांचा दावा आहे.