आता कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; केंद्राने दिले ‘हे’ आदेश

Ahmednagarlive24 office
Published:

आपण जेव्हा काही कामानिमित्त सरकारी कार्यालयात जातो तेव्हा बहुतेक वेळा येथील अनेक सरकरी कर्मचारी कार्यालयाची वेळ झाल्यानंतर देखील आलेले नसतात. तसेच साहेब आत्ताच बाहेर गेले आहेत, कधी परत येतील सांगता येणार नाही. असे नेहमीचे उत्तर मिळते. यामुळे सर्वसामान्य जनतेची अनेक कामे वेळेत मार्गी लागत नाहीत.

तसेच कामात हलगर्जीपणा केल्याने सरकारी ध्येय धोरणाबाबर जनतेत नकारात्मक संदेश जातो. मात्र आता या नेहमीच्या सवयीप्रमाणे कार्यालयात उशिरा येणे अथवा लवकर निघून जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची आता खैर नाही. कारण अशा या लेटलतिफ कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या कार्यकाळाची सूत्रे हाती घेतल्यानंतर केंद्र सरकारने आळशी, उशिरा येणारे सरकारी बाबू व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले आहे. कार्यालयात उशिरा पोहोचणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांवर संबंधित विभागाने कठोर कारवाई करावी, असे सरकारने बजावले आहे. कार्यालयात उशिरा येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारावा, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

त्याच सोबत सवयीप्रमाणे कार्यालयात विलंबाने येणे आणि घाईगडबडीत काम आटोपून घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीची दखल घेण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारच्या अखत्यारीतीतील सर्वच विभागांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘एईबीएएस’चा वापर करून हजेरी नोंदवण्याची तसदी घ्यावी. यात बायोमेट्रिक मशीन चोवीस तास सुरू आहे काय? याची खात्री सर्वच विभागांनी व मंत्रालयांनी करावी, अशा सूचनासुद्धा केंद्र सरकारने केल्या आहेत.

अनेक विभागांतील कर्मचारी ‘आधार सक्षम बायोमेट्रिक प्रणाली ‘मध्ये (एईबीएएस) हजेरी लावत नसल्याची बाब समोर आली. काही कर्मचारी तर नियमितपणे कार्यालयात उशिरा येत असल्याचेही निदर्शनास आले. असे प्रकार रोखणे व शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळमर्यादा पाळण्याची सवय लावण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत. नियम धाब्यावर बसवून शासकीय सेवेत आळशीपणा दाखवणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे केंद्र सरकारने बजावले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe