आता ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल करण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागणार नाही ! घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स होणार रिन्यू

Published on -

Driving Licence Renewal : देशभरातील वाहनाचालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी ज्या वाहन चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स या वर्षात एक्सपायर होत आहे त्यांच्यासाठी खास ठरणार आहे. 2026 मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स संपणाऱ्या वाहनचालकांसाठी सरकारकडून एक महत्त्वाचा आणि अगदीच दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. आता भारत सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणाची प्रक्रिया फारच सोपी केली आहे. नव्या निर्णयामुळे ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण करताना आरटीओ कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याचे कामच राहणार नाही.

कारण की आता ही प्रक्रिया बहुतांशी ऑनलाइन झाली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सारथी ह्या पोर्टलमुळे नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी RTO च्या फेऱ्या कमी कराव्या लागत असून अनेक कामे घरी बसूनच पूर्ण करता येत आहेत. ड्रायव्हिंगसाठी वैध परवाना असणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे परवाना संपण्यापूर्वीच त्याचे नूतनीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. खाजगी ड्रायव्हिंग लायसन्स सामान्यतः जारी केल्याच्या तारखेपासून 20 वर्षांसाठी किंवा चालकाचे वय 40 ते 50 वर्षांपर्यंत वैध असते.

मात्र व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्ससाठी दर 3 ते 5 वर्षांनी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ड्रायव्हिंग लायसन्स संपण्यापूर्वी तब्बल एक वर्ष आधीपासून नूतनीकरणासाठी अर्ज करता येतो. परवाना संपल्यानंतर 30 दिवसांचा ‘ग्रेस पीरियड’ दिला जातो, या कालावधीत कोणताही दंड आकारला जात नाही. मात्र 30 दिवसांनंतर अर्ज केल्यास विलंब शुल्क द्यावे लागते. जर परवाना 5 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी संपलेला असेल, तर नवीन परवाना काढावा लागतो किंवा पुन्हा ड्रायव्हिंग चाचणी द्यावी लागू शकते.

ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणाचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ऑनलाइन प्रक्रिया. यासाठी sarathi.parivahan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागते. वेबसाइटवर राज्य निवडल्यानंतर ‘Driving Licence Services’ या पर्यायात जाऊन ‘Renewal of Driving Licence’ वर क्लिक करावे. त्यानंतर DL क्रमांक, जन्मतारीख आणि कॅप्चा भरावा लागतो. अर्ज प्रक्रियेत ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, फोटो आणि स्वाक्षरी अशी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. शुल्क भरण्यासाठी UPI, नेट बँकिंग किंवा डेबिट/क्रेडिट कार्डचा वापर करता येतो.

काही प्रकरणांमध्ये बायोमेट्रिक किंवा कागदपत्र पडताळणीसाठी RTO मध्ये अपॉइंटमेंट घ्यावी लागते. अर्ज क्रमांकाच्या मदतीने नूतनीकरणाची स्थिती ऑनलाइन ट्रॅक करता येते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नूतनीकरण केलेले स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स कार्ड 15 ते 30 दिवसांत थेट संबंधित अर्जदाराच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवले जाते. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स चा कालावधी संपल्यानंतर ताबडतोब रिन्यूअल साठी अर्ज करावा आणि वाहन चालवताना येणाऱ्या अडचणी टाळाव्यात असे आवाहन केले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News