Numerology Secrets : वैद्यकीय ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे अंकशास्त्र. ज्योतिष शास्त्रात बारा राशी नवग्रह तसेच नक्षत्र यांना विशेष महत्त्व असते. त्याचप्रमाणे अंकशास्त्रात अंकांना विशेष महत्त्व असते. अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या जन्मतारखेवरून अधोरेखित करता येतो.
फक्त व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा स्वभाव, त्याचे नशीब, त्याच भूत, भविष्य, वर्तमान सर्व काही ओळखता येऊ शकते असा दावा अंकशास्त्रात करण्यात आला आहे.

अंकशास्त्रात सांगितल्याप्रमाणे व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा मुलांक काढला जातो आणि हाच मुलांक सारं काही सांगतो. मुलांक हा एक ते नऊ दरम्यान गणला जातो.
दरम्यान आज आपण अशा एका मुलांकाची माहिती जाणून घेणार आहोत जे उशिरा का होईना पण शंभर टक्के आपल्या आयुष्यात यशस्वी होतात, ते कधीच अपयशी ठरत नाहीत.
मुलांक कसा काढला जातो?
समजा एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख ३१ आहे तर अशा व्यक्तीचा मुलांक हा ३+१=४ राहणार आहे. मुलांक काढताना महिन्याचे बंधन नसते, अर्थातच कोणत्याही महिन्याला ३१ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक हा चार राहणार आहे.
दरम्यान एक ते नऊ दरम्यानच्या प्रत्येक मूलांकाचा एखाद्या ग्रहाशी विशेष संबंध मानला जातो. दरम्यान आज आपण मुलांक १ बाबत माहिती जाणून घेणार आहोत आणि हा मुलांक ‘ग्रहांचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्याशी संबंधित आहे.
या मुलांकाचा स्वामीग्रह हा सूर्य आहे. ज्योतिष तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला जन्मलेले लोक या मूलांकात मोडतात. अंकशास्त्राच्या मते, या लोकांच्या जीवनात यश थोड्या उशिरा येते, मात्र ते यश भक्कम, दीर्घकाळ टिकणारे आणि मोठी ओळख देणारे असते.
मूलांक १ असलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व राजेशाही असते. सूर्य जसा स्वतःच्या प्रकाशावर तेजस्वी असतो, तसेच हे लोक कोणाच्याही आधाराशिवाय स्वतःची प्रगती करण्याची क्षमता ठेवतात.
नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि स्पष्ट विचारसरणी ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. हे लोक सहसा दुसऱ्यांच्या अधिपत्याखाली काम करणे पसंत करत नाहीत. स्वतंत्र निर्णय घेणे आणि स्वतःचा मार्ग स्वतःच घडवणे त्यांना अधिक भावते. सूर्याच्या प्रभावामुळे मूलांक १ चे लोक शिस्तप्रिय आणि स्पष्टवक्ते असतात.
मनातले विचार थेट मांडण्याची सवय असल्याने कधी कधी त्यांना अहंकारी समजले जाते, मात्र प्रत्यक्षात ते प्रामाणिक आणि सरळ स्वभावाचे असतात. करिअरच्या दृष्टीने मूलांक १ साठी २०२५ हे वर्ष महत्त्वाचे मानले जात आहे. अंकशास्त्रानुसार २०२५ या वर्षाची बेरीज ९ येते आणि १ व ९ हे मित्र अंक असल्याने प्रगतीचे योग अधिक मजबूत होतात.
राजकारण, प्रशासकीय सेवा, स्पर्धा परीक्षा, लष्कर, तसेच व्यवसाय आणि स्टार्टअप क्षेत्रात या लोकांना विशेष यश मिळू शकते. सुरुवातीच्या वयात संघर्ष असला तरी ३२ ते ३५ वर्षांनंतर आर्थिक स्थैर्य आणि संपत्तीचा ओघ वाढतो.
प्रेम आणि वैवाहिक जीवनात मूलांक १ चे लोक वर्चस्व गाजवणारे असले तरी अत्यंत एकनिष्ठ असतात. त्यांना बुद्धिमान आणि स्वाभिमानी जोडीदार आवडतो.
विशेषतः मूलांक १ असलेल्या महिलांना सासरी सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. आरोग्याच्या बाबतीत सूर्याशी संबंधित डोळे आणि हाडांच्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
पिवळा, लाल व सोनेरी रंग शुभ मानले जातात, तर रविवार आणि सोमवार महत्त्वाच्या कामांसाठी अनुकूल दिवस ठरतात. अंकशास्त्रानुसार, मूलांक १ च्या व्यक्तींचा जन्म नेतृत्वासाठी झालेला असून उशिरा मिळणारे यश त्यांना अधिक समृद्धी देणारे ठरते.