सोलापूर बाजारात कांद्याच्या आवकीत घट, तरीही भावांमध्ये उसळी नाही; शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

Published on -

Onion Market News : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याची आवक तुलनेने घटली असली, तरी अपेक्षेप्रमाणे बाजारभावात वाढ न झाल्याने शेतकऱ्यांची निराशा वाढली आहे. गुरुवारी बाजारात एकूण ५३६ ट्रक कांद्याची आवक झाली होती.

मात्र, लिलावात कांद्याचे दर सर्वसाधारणच राहिले. चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल किमान ८०० रुपयांपासून ते कमाल २,००० रुपयांपर्यंतच भाव मिळाला.

गेल्या आठवड्यात शनिवार, रविवार आणि प्रजासत्ताक दिनाची सुट्टी अशा सलग तीन दिवस बाजार बंद असल्याने, त्यानंतर मंगळवार आणि बुधवारी कांद्याच्या बाजारात तेजी येईल, अशी अपेक्षा शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होती.

मात्र, मंगळवारी ६०४ ट्रक तर बुधवारी ४८७ ट्रक कांद्याची आवक होऊनही बाजारभावात फारसा फरक पडला नाही. त्यामुळे गुरुवारी तरी भाव वाढतील, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणला.

गुरुवारी आवक काहीशी घटूनही अपेक्षित उसळी न आल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली. वाढलेला उत्पादन खर्च, वाहतूक खर्च आणि साठवणुकीची अडचण लक्षात घेता, सध्याचे दर परवडणारे नसल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, बाजार बंद की सुरू, या संदर्भात निर्माण झालेल्या संभ्रमाचाही कांदा बाजारावर परिणाम झाल्याची चर्चा आहे. राज्यात घडलेल्या एका मोठ्या अपघाताच्या घटनेनंतर प्रशासनाने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला होता.

त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बाजार सुरू राहणार की बंद, याबाबत व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या अनिश्चिततेमुळे काही शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणण्याचा निर्णय पुढे ढकलला, तर काहींनी बाजारात आवक केली.

एकूणच, आवक असूनही मागणी अपेक्षेइतकी न वाढल्याने आणि बाजारातील वातावरण अनिश्चित राहिल्याने कांदा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडले आहेत. आगामी काळात तरी बाजारभावात सुधारणा होईल, या आशेवर शेतकरी डोळे लावून आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News