Onion New Variety : कांदा हे भारतातील एक महत्त्वाचे नगदी पीक. याची लागवड देशातील अनेक राज्यांमध्ये होते. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते आणि कांद्याची शेती हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर व्यवसाय असं म्हंटलं जाते.
कारण म्हणजे राज्यातील हवामान कांदा पिकासाठी विशेष पोषक आहे. या पिकाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळतोय. मात्र बदलते वातावरण, उत्पादनासाठी लागणारा खर्च, मजूर टंचाई, वाढलेले मजुरीचे दर,
वाढती महागाई आणि कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्यामुळे अलीकडे या पिकातून शेतकऱ्यांना अपेक्षित कमाई होत नसल्याची वास्तविकता आहे, परिणामी कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
कांद्याची टिकवण क्षमता विशेषतः खरीप हंगामातील कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्यामुळे कांदा उत्पादकांना नाईलाजाने आपला सोन्यासारखा माल कमी भावात विकावा लागतोय. पण आता शेतकऱ्यांसमोरील या मुळ समस्येवर तोडगा निघाला आहे.
खरीप हंगामातील कांदा देखील आता अधिक काळ टिकू शकणार आहे. कारण की भारतीय शास्त्रज्ञांनी अहोरात्र काबाडकष्ट करून कांद्याचे काही नवीन वाण विकसीत केले आहेत. हे कांद्याचे नवीन वाण रब्बी हंगामात लागवडीसाठी उपयुक्त असून याची टिकवण क्षमता सुद्धा जास्त आहे.
नक्कीच या कांद्याच्या नवीन जातीमुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान आता आपण भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या कांद्याच्या एका नव्या वाणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कांद्याचा ‘हा’ नवा वाण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर
पुण्यातील कांदा आणि लसूण संशोधन संस्थेने DOGR-1203-DR हा वाण अलीकडेच विकसित केलाय. ही कांद्याची उच्च उत्पादन देणारी जात असून याचे कंद लाल आणि अंडाकृती असतात. या जातीच्या कांद्याची लागवड केल्यास बेल्या म्हणजे जोड कांद्याची समस्या भेडसावणार नाही.
ही जात लवकर तयार होते अन रब्बी हंगामात या कांद्याची लागवड केली जाते. रब्बी हंगामात, त्याचे देठ सहज आणि आपोआप तुटतात, ज्यामुळे कंद खराब होण्याची शक्यता राहत नाही. या जातीपासून हेक्टरी 278 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते. हा कांदा 5-6 महिने साठवता येतो. जुनागढ, नाशिक, राहुरी आणि पुणे या भागात या जातीच्या कांद्याची लागवड केली जाऊ शकते.