Onion Rate : गेल्या अनेक दिवसांपासून दबावात असणारा कांदा बाजार आता हळूहळू तेजीत येत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. नगर जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या मार्केटमध्ये लाल कांद्याला तब्बल 3000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.
महाराष्ट्रात लाल, रांगडा आणि उन्हाळी अशा तीन प्रकारच्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. यातील लाल कांदा जास्त दिवस साठवता येत नाही. यामुळे कसाही भाव मिळाला तरी देखील लाल कांदा काढणी झाल्याबरोबर शेतकऱ्यांना नाईलाज म्हणून काही दिवसातच विकावा लागतो.

हेच कारण आहे की अनेकदा लाल कांदा शेतकऱ्यांसाठी तोट्याचा विषय ठरतो मात्र यंदा लाल कांद्याला बाजारात समाधानकारक दर मिळत आहे.
नगर जिल्ह्यातील नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल झालेल्या लिलावात कांद्याला तब्बल तीन हजार रुपये प्रति क्विंटल असा कमाल भाव मिळाला असून यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेषता नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कसा आहे कांदा बाजार?
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारातील कांदा मार्केटमध्ये 8 डिसेंबर 2025 रोजीच्या लिलावात कांद्याला समाधानकारक दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून घसरलेले कांद्याचे भाव पुन्हा वाढलेत.
यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळतोय. सोमवारच्या लिलावात 1 नंबर लाल कांद्याला प्रतिक्विंटल 2100 ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. तसेच काही उच्च प्रतीच्या गोण्यांना 2600 ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाल्याची नोंद करण्यात आली.
बाजार समिती प्रशासनाने गावरान कांद्यालाही मार्केटमध्ये चांगला दर मिळत असल्याचे सांगितले. गावरान कांद्याला नेप्तीच्या बाजारात 1700 ते 2100 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
प्रतवारीनुसार 2 नंबर कांद्याला 1500 ते 2100 रुपये रेट मिळाला. 3 नंबर कांद्याला 900 ते 1500 रुपये, तर 4 नंबर कांद्याला 300 ते 900 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
यापूर्वी 6 डिसेंबर रोजी झालेल्या लिलावात लाल कांद्याला 1500 ते 1800 आणि गावरान कांद्याला 1400 ते 1800 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता.
अर्थात 6 डिसेंबरच्या तुलनेत 8 डिसेंबरला बाजारात लाल कांद्याला तसेच गावरान कांद्याला चांगला दर मिळाला आहे. या दरवाढीमुळे येत्या काळात कांद्याचे भाव आणखी वाढू शकतात अशी आशा व्यक्त केली जात आहे.













