अतिवृष्टीतून वाचलेला कांदा बाजारात, पण दर कोसळले; शेतकरी दुहेरी संकटात

Published on -

Onion Rate : अतिवृष्टी, ढगफुटी आणि हवामानाच्या लहरीपणावर मात करत शेतकऱ्यांनी जिवापाड जपलेला कांदा आता मोठ्या प्रमाणावर बाजारात दाखल होऊ लागला आहे. मात्र उशिराने सुरू झालेली ही आवक एकाचवेळी वाढल्याने आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी घटल्याने कांद्याचे दर जोरदार कोसळले आहेत.

उत्पादन खर्च तब्बल ३५ टक्क्यांनी वाढलेला असताना हाती येणारा दर अपुरा ठरत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे.

मागील महिन्यापर्यंत बाजारात उन्हाळ कांद्याची मर्यादित आवक सुरू होती. ती आता पूर्णपणे थांबली असून नवीन लाल कांद्याची काढणी वेगाने सुरू झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात नवीन कांद्याची आवक कमी असल्याने दर काहीसे समाधानकारक होते.

मात्र गेल्या काही दिवसांत काढणीला वेग आल्याने आवक अचानक वाढली आहे. परिणामी ‘पुरवठा जास्त आणि मागणी कमी’ या स्थितीमुळे दरांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापारी विजय बाफना यांनी सांगितले की, साधारणपणे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्तर आणि पूर्व भारतात मोठ्या प्रमाणावर पाठवला जातो. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे.

कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांतही कांद्याचे उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त झाल्याने महाराष्ट्रातील कांद्याला मागणी कमी झाली आहे. नाशिकसह पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर पट्ट्यात एकाचवेळी वाढलेल्या आवकेमुळे दरावर अधिकच दबाव आला आहे.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या ‘आवक भरपूर, पण दर दबावात’ असे चित्र आहे. मंगळवारी (ता. ३) सोलापूर बाजार समितीत तब्बल ४१,५३० क्विंटल आवक झाली. मात्र येथे सरासरी दर राज्यात सर्वात कमी म्हणजे सुमारे ७५० रुपये राहिला.

मनमाड बाजारात सरासरी १,१५० रुपये दर मिळाला, तर सोलापूर आणि मालेगावमध्ये तो १,००० रुपयांच्या खाली घसरला आहे. सोलापूरमध्ये किमान १०० रुपये आणि देवळा येथे १७५ रुपये इतके किमान दर नोंदवले गेले असून, यामुळे दुय्यम प्रतीच्या कांद्याची मोठी आवक असल्याचे स्पष्ट होते.

एकीकडे बियाणे, खत, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली असताना सरासरी ७५० ते १,१५० रुपये दर शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरत आहेत. योग्य दर न मिळाल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News