Panjabrao Dakh News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून आता राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.
भारतीय हवामान खात्याने राज्याच्या दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. हवामान खात्यासोबतच जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी सुद्धा येत्या २४ आणि २५ नोव्हेंबरदरम्यान महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि केरळ या राज्यांमध्ये पडणाऱ्या पावसाचा परिणाम म्हणून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
राज्याच्या सीमालगतच्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांत पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा रिमझिम पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.
राज्यातील 14 जिल्ह्यात पावसाचा अंदाज
डख यांच्या अंदाजानुसार सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पंढरपूर, पुणे, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत फक्त हलका पाऊस अन ढगाळ हवामामाची परिस्थिती राहू शकते.
या भागात पावसाचे प्रमाण फारचं नगण्य राहणार असून, यामुळे कोणतेही नुकसान होण्याची शक्यता नाही. तसेच त्यांनी २५ नोव्हेंबरनंतर राज्यातील पावसाचा जोर पूर्णतः कमी होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
मात्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाची दुसरी लाट राज्यात येण्याची चिन्हे आहेत. २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांत काही ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे.
यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान अधूनमधून पाऊस पडू शकतो. तथापि, हा अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात नसून, व्यापक नुकसान होण्याची शक्यता नाही.
पंजाब डख यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देताना सांगितले की दरवर्षी डिसेंबर महिन्यात २ ते ७ डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रातील विविध भागांत विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची नैसर्गिक प्रवृत्ती दिसते.
त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी विशेष सतर्क राहावे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी तर २४ आणि २५ नोव्हेंबरदरम्यान होऊ शकणाऱ्या रिमझिम पावसामुळे आपल्या बागांची अतिरिक्त काळजी घेण्याचे आवाहन डख यांनी केले आहे.
राज्यात ५ डिसेंबरपर्यंत हवामान ढगाळ आणि अस्थिर राहण्याची शक्यता असून, त्यानंतर पुन्हा एकदा तीव्र थंडीची लाट पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी हवामानातील बदलांचा अंदाज ठेवून शेतीची कामे नियोजनपूर्वक करावीत, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.













