Personal Finance Rule : आजच्या काळात पैसे कमावण्याइतकेच ते योग्य प्रकारे व्यवस्थापित करणेही मोठे आव्हान बनले आहे. अनेक नोकरदार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये पगार येताच खर्च होतो आणि महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरत नाही, ही सामान्य परिस्थिती झाली आहे.
वाढती महागाई, ईएमआयचा ताण आणि अनावश्यक खर्च यामुळे बचत करणे कठीण जाते. मात्र, काही सोपे आणि प्रभावी वैयक्तिक वित्त नियम पाळल्यास तुम्ही तुमचे आर्थिक जीवन अधिक शिस्तबद्ध करू शकता आणि भविष्यासाठी मजबूत आर्थिक पाया घालू शकता.

50-30-20 नियम स्वीकारा
वैयक्तिक वित्त व्यवस्थापनासाठी 50-30-20 हा नियम अत्यंत उपयुक्त मानला जातो. या नियमानुसार, तुमच्या एकूण उत्पन्नातील 50 टक्के रक्कम घरभाडे, किराणा, वीज-पाणी बिल, शिक्षण आणि प्रवास यांसारख्या आवश्यक खर्चासाठी वापरावी.
30 टक्के रक्कम स्वतःसाठी-म्हणजेच छंद, मनोरंजन, खरेदी किंवा प्रवासासाठी-ठेवावी. उरलेले 20 टक्के उत्पन्न बचत आणि गुंतवणुकीसाठी राखीव ठेवावे. हा नियम पाळल्यास खर्चावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते.
आपत्कालीन निधी तयार करा
आर्थिक सुरक्षिततेसाठी आपत्कालीन निधी अत्यंत महत्त्वाचा आहे. नोकरी जाणे, वैद्यकीय खर्च किंवा अचानक उत्पन्न थांबणे अशा परिस्थितीत हा निधी मोठा आधार ठरतो. किमान 3 ते 6 महिन्यांच्या आवश्यक खर्चाइतकी रक्कम वेगळी ठेवण्याचा प्रयत्न करा.
ईएमआय उत्पन्नाच्या 40 टक्क्यांपर्यंत ठेवा
घर, वाहन किंवा वैयक्तिक कर्जाच्या ईएमआय तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 40 टक्क्यांपेक्षा जास्त नसाव्यात. यापेक्षा जास्त ईएमआय असल्यास दैनंदिन खर्च आणि बचत दोन्ही प्रभावित होतात.
विमा घेण्याला प्राधान्य द्या
गुंतवणुकीसोबतच विमा हा आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा भाग आहे. आरोग्य विमा आणि मुदत जीवन विमा घेतल्यास कुटुंबाचे आर्थिक संरक्षण सुनिश्चित होते.
इक्विटीमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करा
दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. इतिहास पाहता, इक्विटी गुंतवणुकीने महागाईवर मात केली असून चांगले परतावे दिले आहेत.
हे पाच नियम सातत्याने पाळल्यास तुमचे आर्थिक नियोजन अधिक मजबूत होईल आणि भविष्यासाठी निश्चिंतता मिळेल.













