PF News : पीएफ खातेधारकांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशभरातील ईपीएफओ च्या सदस्यांसाठी अर्थात पीएफ अकाउंट असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लवकरच नवी प्रणाली सुरू होणार आहे. या अंतर्गत पीएफ चे पैसे काढणे सोपे होणार आहे.
खरे तर या नव्या प्रणालीची चर्चा केल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे मात्र प्रत्यक्षात ही प्रणाली कधी सुरू होणार हा मोठा सवाल कायम आहे. दरम्यान आता या संदर्भात सरकारमधील मंत्र्यांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

प्रॉविडंट फंडमधील रक्कम काढण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत असून नवीन प्रणाली येत्या काही महिन्यांनी सुरू होणारा अशी माहिती समोर येत आहे.
येत्या काळात पीएफ खात्यातील रक्कम एटीएम आणि यूपीआयच्या माध्यमातून थेट काढण्याची सुविधा सुरू केली जाणार असून, ही सुविधा नव्या वर्षात सुरू होणार अशी माहिती सरकारमधील मंत्र्यांनी दिली आहे.
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी याबाबत माहिती दिली आहे. एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मांडवीय यांनी स्पष्ट केले की श्रम मंत्रालय ईपीएफ खात्याला एटीएम आणि यूपीआय प्रणालीशी जोडण्याची तयारी करत आहे.
यामुळे पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्यातील रक्कम काढण्यासाठी ऑनलाइन पोर्टल, नियोक्तावर अवलंबून राहावे लागणार नाही आणि यामुळे पीएफ खातेधारकांचा मोठा वेळ वाचणार आहे.
मनसुख मांडवीय यांच्या मते, सध्या पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्यातील 75 टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची परवानगी आहे. मात्र, क्लेम फॉर्म, कागदपत्रे आणि मंजुरी प्रक्रियेमुळे अनेक वेळा पैसे मिळण्यास विलंब होतो.
ही अडचण दूर करण्यासाठीच एटीएम आणि यूपीआयद्वारे थेट पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या नव्या सुविधेमुळे क्लेम सेटलमेंटसाठी लागणारा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
सध्या सर्वसामान्य नागरिक दैनंदिन व्यवहारांसाठी एटीएम आणि यूपीआयचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्याच धर्तीवर ईपीएफ प्रणाली अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक करण्याचा सरकारचा उद्देश आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे ही नवीन प्रणाली नवीन वर्षाच्या मार्च महिन्यात सुरु होणार आहे. मार्च 2026 पासून पीएफ खातेधारकांना थेट एटीएम मधून तसेच यूपीआयच्या माध्यमातून अकाउंट मधील पैसे काढता येणार आहेत.
दरम्यान, ईपीएफओने यापूर्वीच पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये अनेक सुलभ बदल केले आहेत. आता क्लेम फॉर्मसोबत चेक किंवा पासबुकच्या पहिल्या पानाचा फोटो अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
आधार ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करून थेट नोंदणीकृत बँक खात्यात रक्कम जमा केली जाते. तसेच पीएफ क्लेम मंजुरीचा कालावधीही कमी करून साधारण तीन दिवसांमध्ये रक्कम खात्यात जमा केली जात आहे.
सरकारच्या या नव्या निर्णयामुळे कोट्यवधी पीएफ खातेधारकांना मोठा दिलासा मिळणार असून, भविष्यात पीएफमधील रक्कम काढणे बँक खात्यातून पैसे काढण्याइतकेच सोपे होणार आहे.













