12.75 लाखांपर्यंत उत्पन्नावर ‘झिरो टॅक्स’; पगारदारांच्या हातात नेमका किती पगार येणार?

Published on -

PF News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या २०२६ च्या अर्थसंकल्पानंतर पगारदार वर्गामध्ये ‘टेक-होम सॅलरी’बाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. नवीन कर प्रणालीत (New Tax Regime) मध्यमवर्गीय आणि पगारदारांना दिलासा देणारे बदल कायम ठेवण्यात आले असून,

विशेषतः १२.७५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. कारण सर्व वजावटींनंतर १२ लाख रुपयांपर्यंत करपात्र उत्पन्न असणाऱ्यांना आता कोणताही आयकर भरावा लागणार नाही.

पगार मोजताना दोन महत्त्वाच्या सवलती निर्णायक ठरतात. पहिली म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन, ज्याअंतर्गत सर्व पगारदारांना सरसकट ७५,००० रुपयांची सूट मिळते.

दुसरी म्हणजे कलम ८७A अंतर्गत रिबेट. वजावटींनंतर करपात्र उत्पन्न १२ लाख रुपयांच्या आत असल्यास, या रिबेटमुळे तुमचा कर थेट ‘झिरो’ होतो. त्यामुळे प्रत्यक्षात हातात येणारा पगार वाढण्यास मदत होते.

जर एखाद्या कर्मचाऱ्याचे वार्षिक सीटीसी १० लाख रुपये असेल, तर ७५,००० रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन वजा केल्यानंतर करपात्र उत्पन्न ९.२५ लाख रुपये राहते. हे उत्पन्न १२ लाखांच्या मर्यादेत असल्याने कर पूर्णपणे माफ होतो.

कर वजा न धरता महिन्याला साधारण ८३,३३३ रुपये पगार मिळतो. मात्र, नवीन बेसिक पे नियमांनुसार (किमान ५०%) वार्षिक ५ लाख रुपये बेसिक धरले जातात. यावर कर्मचारी आणि कंपनीचा पीएफ मिळून महिन्याला सुमारे १०,००० रुपये कपात होते.

त्यामुळे प्रत्यक्षात कर्मचाऱ्याच्या हातात साधारण ७३,३३३ रुपये येतात. मात्र, वर्षाला १.२० लाख रुपये पीएफच्या स्वरूपात खात्यात जमा होतात, जे दीर्घकालीन बचतीसाठी फायदेशीर आहे.

दुसरीकडे, १२ लाख रुपये सीटीसी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीही कराचा भार शून्यच आहे. या पगारात बेसिक वेतन ६ लाख रुपये (महिन्याला ५०,०००) धरले जाते. त्यावर १२% पीएफनुसार कर्मचारी आणि कंपनीकडून प्रत्येकी ६,००० रुपये महिन्याला पीएफसाठी जातात.

त्यामुळे वर्षाला एकूण १.४४ लाख रुपये पीएफमध्ये जमा होतात. ग्रॅच्युटीची तरतूद असल्यास सुमारे २८,८४८ रुपये वेगळे जातात. परिणामी, जुन्या नियमानुसार ९१,३५७ रुपये मिळणारा मासिक पगार नव्या नियमानुसार ८५,५९६ रुपये इतका राहतो. म्हणजेच सुमारे ५,७६१ रुपयांचा फरक पडतो.

एकूणच, Budget 2026 मुळे पगारदार वर्गाला करमुक्त उत्पन्नाची मोठी मर्यादा मिळाली असली, तरी पीएफ आणि इतर कपातीमुळे प्रत्यक्ष हातात येणाऱ्या पगाराचे गणित समजून घेणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe