PM Kisan Yojana : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM-KISAN) योजनेंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारकडून दिली जाते.
ही रक्कम वर्षभरात तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. प्रत्येक हप्ता २,००० रुपयांचा असतो. मात्र, आता कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर येत असून, पुढील हप्त्यात काही शेतकऱ्यांना थेट ४,००० रुपये मिळण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत या योजनेअंतर्गत २१ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. १९ नोव्हेंबर रोजी २१ वा हप्ता पात्र शेतकऱ्यांना देण्यात आला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिना सुरू झाला असला तरी २२ वा हप्ता अद्याप जमा झालेला नाही.
त्यामुळे शेतकरी वर्ग या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच समोर आलेल्या माहितीनुसार, काही विशिष्ट शेतकऱ्यांना यावेळी नियमित २,००० रुपयांऐवजी थेट ४,००० रुपये मिळू शकतात.
ही अतिरिक्त रक्कम कशी मिळणार, याबाबत सविस्तर माहिती अशी की, ज्या शेतकऱ्यांना २१ वा हप्ता मिळाला नव्हता, त्यांना पुढील हप्त्यासोबत मागील थकीत हप्ता दिला जाऊ शकतो. यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचे शेतकरी येतात.
पहिला गट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण केली नव्हती आणि दुसरा गट म्हणजे अर्जामध्ये त्रुटी असल्यामुळे ज्यांचा हप्ता थांबवण्यात आला होता.
अशा शेतकऱ्यांनी आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि अर्जातील चुका दुरुस्त केल्या असतील, तर त्यांना २१ वा आणि २२ वा असे दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, होळी सणापूर्वी म्हणजेच ४ मार्च २०२६ पूर्वी २२ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा त्यांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.













