PM किसान सन्मान निधी योजना: 22 वा हप्ता फेब्रुवारीत मिळणार? स्टेटस कसे तपासाल जाणून घ्या सविस्तर माहिती

Published on -

PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळत आहे. विशेषतः अल्पभूधारक आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी ही योजना आर्थिक आधार ठरत आहे.

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2 हजार रुपये, म्हणजेच एकूण 6 हजार रुपये थेट DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

ही योजना केंद्र सरकारद्वारे राबवली जात असून आतापर्यंत लाखो नव्हे तर कोट्यवधी शेतकरी या योजनेशी जोडले गेले आहेत. शेतकऱ्यांना कोणत्याही मध्यस्थांशिवाय थेट खात्यात रक्कम मिळत असल्याने ही योजना शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरली आहे.

दरम्यान, यंदा 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22 व्या हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. माहितीनुसार, या योजनेतील प्रत्येक हप्ता साधारण चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.

नोव्हेंबर 2025 मध्ये 21 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यामुळे चार महिन्यांच्या अंतराने पाहता, 22 वा हप्ता फेब्रुवारी 2026 मध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, आपल्या खात्यात 22 वा हप्ता जमा होणार आहे की नाही, हे शेतकरी सहजपणे तपासू शकतात. यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ला भेट द्यावी. त्यानंतर ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करावे.

येथे रजिस्ट्रेशन क्रमांक टाकावा लागतो. जर हा क्रमांक आठवत नसेल किंवा उपलब्ध नसेल, तर ‘Know Your Registration Number’ या पर्यायावर क्लिक करून तो मिळवता येतो.

रजिस्ट्रेशन क्रमांक भरल्यानंतर स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड टाकून ‘Get Details’ या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर तुमचा पीएम किसान योजनेचा सध्याचा स्टेटस स्क्रीनवर दिसेल. येथे तुमचे नाव आणि हप्त्याची माहिती दिसेल. जर नाव दिसत नसेल, तर ई-केवायसी पूर्ण झाली आहे की नाही, हे तपासणे आवश्यक आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण करून आपली माहिती अद्ययावत ठेवावी, जेणेकरून पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता वेळेवर खात्यात जमा होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe