‘या’ कारणांमुळे पीएम किसानचा 22वा हप्ता रखडला; शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार दोन हजार रुपये ?

Published on -

PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा 22वा हप्ता अद्याप जमा न झाल्याने देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि चिंता वाढली आहे.

नोव्हेंबर 2025 मध्ये 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. त्यानंतर जानेवारी–फेब्रुवारी 2026 दरम्यान पुढील हप्ता मिळेल, अशी अपेक्षा होती. अर्थसंकल्पानंतर लगेचच हप्ता जाहीर होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता; मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

या विलंबामागे एकच ठोस कारण सरकारकडून जाहीर करण्यात आलेले नसले तरी काही महत्त्वाचे मुद्दे पुढे येत आहेत. त्यापैकी प्रमुख कारण म्हणजे ‘फार्मर आयडी’ची सक्ती.

केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की पीएम किसानचा लाभ सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे वैध फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. अनेक राज्यांत विशेष मोहिमा राबवून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी अजूनही मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झालेली नाही. परिणामी लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्यात विलंब होत आहे.

दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अपात्र आणि बनावट लाभार्थ्यांची छाननी. काही ठिकाणी चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे किंवा एकाच जमिनीवर अनेकांनी हप्ता घेतल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

त्यामुळे केंद्राने राज्यांना कठोर पडताळणीचे निर्देश दिले आहेत. उत्तर प्रदेशात सुमारे 19 लाख शेतकऱ्यांच्या हप्त्यावर तात्पुरती रोक लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. छाननी पूर्ण झाल्यानंतरच पुढील वितरण होणार असल्याने प्रक्रियेला वेळ लागत आहे.

याशिवाय ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडचणी, इंटरनेटची मर्यादा आणि माहितीचा अभाव यामुळे अनेक शेतकरी स्वतः नोंदणी करू शकत नाहीत. त्यामुळे सीएससी केंद्रे व शिबिरांमध्ये गर्दी वाढली आहे.

22वा हप्ता नेमका कधी येणार, याबाबत अधिकृत तारीख नसली तरी तज्ज्ञांच्या मते होळीपूर्वी रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांनी फार्मर आयडी, आधार-बँक खाते संलग्नता आणि ई-केवायसी अद्ययावत ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News