Post Office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पोस्टाच्या बचत योजना फायद्याच्या ठरत आहे. भारतीय गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित आणि हमी परताव्याचा पर्याय म्हणून पोस्ट ऑफिसच्या बचत योजना नेहमीच आकर्षणाचा विषय राहिल्या आहेत.
अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक वाढलेली असतानाही पोस्टाच्या बचत योजना लोकप्रिय आहेत. कारण म्हणजे पोस्टाच्या बचत योजनांना सरकारकडून पूर्ण समर्थन मिळते म्हणजेच येथे गुंतवलेला पैसा बुडत नाही.

दरम्यान गेल्या काही महिन्यांच्या काळात आरबीआय कडून रेपो रेटमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे आणि यामुळे बँकांचे एफडी योजनांचे व्याजदर पण कमी होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक वाढत चालली आहे.
दरम्यान जर तुम्ही ही पोस्टाच्या बचत योजनेत गुंतवणुकीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ योजना फायद्याची ठरू शकते. कमी जोखीम, स्टेबल रिटर्न आणि करसवलत या तिन्ही गोष्टींचा उत्तम मेळ साधणारी ही योजना सध्याच्या घडीला गुंतवणूकदारांसाठी आर्थिक लाभाची राहणार आहे.
सरकारकडून सध्या पीपीएफवर वार्षिक ७.१ टक्के टॅक्स फ्री व्याज दिलं जातं. यासोबतच आयकर कायद्यातील कलम 80C अंतर्गत या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर करसवलतीचा लाभ मिळतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही योजना EEE (Exempt-Exempt-Exempt) श्रेणीत मोडते.
म्हणजेच गुंतवणुकीची रक्कम, त्यावर मिळणारं व्याज आणि मॅच्युरिटीला मिळणारी अंतिम रक्कम — हे सर्व पूर्णपणे करमुक्त असतं. त्यामुळे उच्च कर slab मध्ये असलेल्या गुंतवणूकदारांसाठीही ही योजना अत्यंत फायदेशीर ठरते. पीपीएफ योजनेचा लॉक-इन कालावधी १५ वर्षांचा आहे.
केवळ ५०० रुपयांपासून खातं सुरू करता येतं, तर एका आर्थिक वर्षात कमाल १.५ लाख रुपये गुंतवता येतात. दरवर्षी जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवणूक सातत्याने केली, तर १५ वर्षांच्या शेवटी तब्बल ४० लाख रुपयांहून अधिक निधी जमा होऊ शकतो.
गणितानुसार या कालावधीत एकूण २२.५ लाख रुपये मूळ गुंतवणूक होते, तर १८ लाख रुपयांहून अधिक व्याज मिळून अंतिम रक्कम सुमारे ४०.६८ लाख रुपये हातात येते. याशिवाय, १५ वर्षांची मुदत पूर्ण झाल्यानंतर हवे असल्यास खाते पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
पीपीएफ खात्यावर कर्जाची सुविधाही मिळते, तसेच खाते उघडल्यापासून पाच वर्षांनंतर अंशतः रक्कम काढण्याची परवानगी असते. त्यामुळे दीर्घकालीन बचत, निवृत्ती नियोजन किंवा भविष्यातील महत्त्वाच्या गरजांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरते.
पीपीएफ खाते कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा अधिकृत बँकेत सहज उघडता येते. सुरक्षितता, विश्वास आणि स्थिर परतावा या तिन्ही बाबींचा विचार करता, गुंतवणुकीसाठी विश्वसनीय आणि जोखीममुक्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी पीपीएफ योजना आजही सर्वोत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे.