Post Office Scheme : जर तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा काही भाग सुरक्षित आणि हमखास परतावा देणाऱ्या गुंतवणुकीच्या बचत योजनेत गुंतवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसची एक जबरदस्त बचत योजना तुमच्या फायद्याची ठरणार आहे. पोस्ट ऑफिसची “महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजना” (MSSC) तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ही योजना महिलांसाठी खास तयार करण्यात आली असून त्यावर सरकारकडून आकर्षक 7.5% वार्षिक व्याज दिले जात आहे.
योजनेचे वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे
पोस्ट ऑफिसची महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना दोन वर्षांची आहे. इतर कोणत्याही 2 वर्षांच्या एफडीच्या तुलनेत यामध्ये गुंतवणूकदारांना अधिकचे व्याज दिले जात आहे. यात गुंतवणूक करणाऱ्या महिला गुंतवणूकदारांना तब्बल 7.5 टक्के दराने परतावा दिला जातोय.
![Post Office Scheme](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Post-Office-Scheme-6.jpeg)
ही एक सरकारी बचत योजना असल्याने, ही योजना सरकारच्या देखरेखीखालील असल्याने गुंतवणुकीवर कोणताही धोका नाही. अर्थातच यामध्ये गुंतवलेले पैसे बुडत नाहीत. या योजनेत कोणत्याही वयोगटातील महिला किंवा मुलींच्या नावाने गुंतवणूक करता येते. या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे एक वर्ष पूर्ण झाल्यावर गुंतवणुकीच्या 40% रक्कम काढता येणे शक्य आहे.
गुंतवणुकीसाठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेत गुंतवणूक करायची असल्यास महिलांना आधार कार्ड , पॅन कार्ड , रंगीत पासपोर्ट साइज फोटो अन संबंधित महिलेचे पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणे आवश्यक आहे.
गुंतवणुकीची अंतिम तारीख
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे ज्यांना त्यांची पत्नी, आई, बहीण किंवा मुलीच्या नावाने सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक करायची आहे, त्यांनी लवकरात लवकर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
व्याज आणि परतावा
या योजनेत एखाद्या महिलेने दोन लाख रुपयाचे गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीवर म्हणजे दोन वर्षाच्या कालावधीनंतर संबंधित महिलेला 7.50% दराने दोन लाख 32 हजार 44 रुपये मिळणार आहेत. अर्थातच संबंधित महिलेला 32 हजार 44 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे एखाद्या महिलेने या योजनेत ₹2,00,000 गुंतवले, तर 1 वर्षानंतर त्यांना चाळीस टक्के रक्कम म्हणजेच ₹80,000 रुपये काढता येतात आणि 2 वर्षांनंतर त्यांना व्याजासह संपूर्ण रक्कम मिळते.
का निवडावी ही योजना
ही योजना छोट्या गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. यात नियमित आणि हमखास परतावा मिळतो. महिलांसाठी वित्तीय स्थैर्य निर्माण करणारी योजना आहे. कमी कालावधीसाठी सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. महिला सशक्तीकरण आणि त्यांच्या आर्थिक स्वायत्ततेसाठी ही एक उत्तम योजना आहे.
जर तुम्हाला तुमच्या घरातील महिला सदस्यांसाठी सुरक्षित आणि नफा देणारी गुंतवणूक करायची असेल, तर MSSC योजना ही उत्तम निवड ठरू शकते. परंतु, यासाठी 31 मार्चपूर्वी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यामुळे वेळ न घालवता आजच पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ही सुवर्णसंधी साधा अन आपला पैसा वाढवा.