PPF Calculator : सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा एक उत्तम पर्याय मानला जातो. PPF अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना सरकारद्वारे समर्थित असल्याने यामध्ये जोखीम अगदी कमी असून चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो.
या योजनेतून नागरिकांना वार्षिक जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. दरम्यान जर तुम्ही दरवर्षी PPF मध्ये 1.50 लाख रुपये गुंतवत असाल, तर तुम्हाला किती परतावा मिळू शकतो? याच बाबत आज आपण माहिती पाहणार आहोत.

PPF वर मिळणारे व्याजदर
सध्या PPF खात्यावर वार्षिक 7.1% दराने व्याज मिळते (फेब्रुवारी 2025 पर्यंतचा डेटा). हा दर वेळोवेळी सरकारकडून बदलला जातो. PPF ची खासियत म्हणजे यात चक्रवाढ व्याज लागू होतं, त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळू शकतो.
1.50 लाख रुपये वार्षिक गुंतवल्यास किती परतावा?
PPF खाते कमीत कमी 15 वर्षांसाठी असते. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेला पंधरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर पाच पाच वर्षांची मुदत वाढ देता येते. दरम्यान जर तुम्ही प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा केले, तर पंधरा वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर चाळीस लाखाहून अधिक रिटर्न मिळणार आहेत.
पीपीएफ खात्यात दरवर्षी दीड लाखांची गुंतवणूक केली तर पंधरा वर्षांनी 22 लाख 50 हजार रुपयांची रक्कम यामध्ये गुंतवली जाईल आणि यावर 18 लाख 18 हजार रुपये व्याज मिळणार आहे म्हणजेच गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला मॅच्युरिटीवर 40 लाख 68 हजार रुपये मिळणार आहेत.
जर पीपीएफ मध्ये 20 वर्षांसाठी दरवर्षी दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटी वर 66 लाख 58 हजार रुपये मिळणार आहेत यामध्ये तीस लाख रुपये गुंतवणूक असेल आणि उर्वरित 36 लाख 58 हजार रुपये हे व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.
जर पीपीएफ मध्ये 25 वर्षांसाठी दरवर्षी दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटी वर 1.04 कोटी रुपये मिळणार आहेत यामध्ये 37 लाख 50 हजार रुपये गुंतवणूकदाराची गुंतवणूक राहणार आहे आणि उर्वरित 66 लाख 58 हजार रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.
PPF गुंतवणुकीचे फायदे
✔ टॅक्स फायदे: PPF वरील गुंतवणूक 80C अंतर्गत करमुक्त असते.
✔ सुरक्षित गुंतवणूक: सरकारची हमी असल्याने रकमेवर कोणताही धोका नाही.
✔ चक्रवाढ व्याजाचा लाभ: दीर्घ मुदतीत मोठा परतावा मिळतो.
✔ 5 वर्षांनंतर कर्ज सुविधा: गरज असल्यास खात्यातील रक्कमेवर कर्ज मिळू शकते.
PPF गुंतवणूक योग्य ठरेल का?
PPF ही दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी योग्य योजना आहे. जसे की मुलांचे शिक्षण, लग्न, निवृत्ती नियोजन इत्यादीसाठी. मात्र, अल्पकालीन गुंतवणुकीसाठी याचा उपयोग होणार नाही, कारण मुदतपूर्व पैसे काढण्यावर काही अटी असतात.