Private Jet : आकाशात उडणारं आलिशान प्रायव्हेट जेट पाहिलं की अनेकांच्या मनात एक प्रश्न हमखास येतो-हे जेट फक्त उद्योगपती, सेलिब्रिटी किंवा राजकारण्यांसाठीच असतं की आपल्यासारखा सामान्य माणूसही ते बुक करू शकतो? प्रत्यक्षात पाहिलं तर प्रायव्हेट जेट किंवा चार्टर्ड विमान बुक करणं कोणालाही शक्य आहे.
यासाठी कोणतीही खास ओळख, शिफारस किंवा सरकारी परवानगी लागत नाही. मात्र, यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तयारी असणं अत्यावश्यक आहे.

भारतात सध्या अनेक चार्टर्ड एव्हिएशन कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्या प्रवाशांच्या गरजेनुसार हेलिकॉप्टर, छोटे चार्टर्ड प्लेन किंवा आलिशान प्रायव्हेट जेट भाड्याने देतात. चार्टर्ड विमानांचं भाडं मुख्यतः प्रति तास आकारलं जातं. तुम्ही किती अंतराचा आणि किती तासांचा प्रवास करता, यावर अंतिम खर्च अवलंबून असतो.
लहान आणि हलक्या वजनाच्या चार्टर्ड प्लेनसाठी साधारणपणे तासाला दीड लाख ते दोन लाख रुपये खर्च येतो. हे विमान कमी अंतराच्या आणि 4 ते 6 प्रवाशांसाठी योग्य मानले जातात. मध्यम स्वरूपाच्या चार्टर्ड प्लेनचा विचार केला, तर त्यांचं भाडं तासाला 4 ते 6 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतं.
ही विमानं अधिक आरामदायक असून 8 ते 10 प्रवासी सहज प्रवास करू शकतात. मोठ्या, आलिशान आणि सर्व अत्याधुनिक सुविधा असलेल्या प्रायव्हेट जेटसाठी तासाला 8 लाख रुपये किंवा त्याहून अधिक खर्च येऊ शकतो.
याचा अर्थ असा की, जर एखाद्याला प्रायव्हेट जेटने दोन ते तीन तासांचा प्रवास करायचा असेल, तर त्यासाठी किमान 10 ते 20 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असतो. एवढी रक्कम ही सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबासाठी आयुष्यभराची कमाई असू शकते. त्यामुळेच बहुतांश वेळा प्रायव्हेट जेटचा वापर मोठे उद्योगपती, कॉर्पोरेट कंपन्या, फिल्म इंडस्ट्रीतील कलाकार किंवा अतिशय श्रीमंत व्यक्ती करतात.
दरम्यान, केवळ भाड्यानेच नव्हे तर प्रायव्हेट विमान खरेदी करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. भारतात छोट्या प्रायव्हेट प्लेनची किंमत साधारणपणे 15 कोटींपासून 35 कोटी रुपयांपर्यंत असते. त्यात देखभाल, इंधन, पायलट आणि पार्किंगचा खर्च वेगळा असतो.
थोडक्यात सांगायचं झालं तर, प्रायव्हेट जेट बुक करणं कायदेशीरदृष्ट्या सोपं असलं, तरी ते आर्थिकदृष्ट्या अत्यंत महागडं स्वप्न आहे. म्हणूनच आजही प्रायव्हेट जेट हे लक्झरी आणि श्रीमंतीचं प्रतीक मानलं जातं.













