शेतजमीन किंवा कोणत्याही मालमत्तेसाठी तयार करण्यात आलेले बक्षीसपत्र रद्द करता येते का ? कायदा काय सांगतो?

Property News : देशात मालमत्तेवरून मोठ्या प्रमाणात वाद-विवाद होताना दिसतात. कायद्याची फारशी माहिती नसल्याने असे वाद होतात. अनेकदा मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी करण्यात आलेल्या बक्षीस पत्रावरून देखील वादविवाद होतात.

अशा परिस्थितीत आज आपण शेतजमीन किंवा कोणत्याही मालमत्तेसाठी तयार करण्यात आलेले बक्षीस पत्र रद्द करता येऊ शकते का? या संदर्भात कायद्यात नेमके कसे नियम आहेत? याविषयी आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

बक्षीस पत्र म्हणजे काय ?

बक्षीस पत्र रद्द करता येऊ शकते की नाही हे जाणून घेण्याआधी आपण बक्षीस पत्र म्हणजे काय हे समजून घेऊया. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की शेतजमीन किंवा कोणतीही मालमत्ता विनामूल्य एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करण्यासाठी गिफ्ट डिड अर्थातच बक्षीसपत्र बनवले जाऊ शकते.

म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला बक्षीस म्हणून अशी मालमत्ता ट्रान्सफर होते. बक्षीस पत्र हा एक महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज मानला जातो.

कोणताही मोबदला न घेता घर, जमीन किंवा इतर मालमत्ता दान स्वरूपात देताना बक्षीसपत्र केले जाते. मात्र, हे बक्षीसपत्र वैध ठरण्यासाठी त्यावर योग्य स्टॅम्प ड्युटी भरून दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करणे सुद्धा कायद्याने बंधनकारक आहे.

बक्षीस पत्र रद्द करता येणे शक्य आहे का?

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बक्षीस पत्र रद्द करता येणे सहसा अशक्य आहे. सामान्यतः एकदा बक्षीसपत्र तयार करून ते स्वीकारले गेले आणि नोंदणीकृत झाले की ते रद्द करता येत नाही. मात्र, काही विशेष परिस्थितीत कायद्याने त्याला अपवाद दिले आहेत.

जर बक्षीसपत्र करताना फसवणूक, बळजबरी, दबाव, चुकीची माहिती किंवा मानसिक अथवा शारीरिक त्रास देऊन दान करून घेतले असेल, तर असे बक्षीसपत्र न्यायालयात आव्हान देता येते. अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्ती दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून बक्षीसपत्र रद्द करण्याची मागणी करू शकते.

तसेच, बक्षीसपत्र करताना कायद्याचे नियम पाळले नसतील, स्टॅम्प ड्युटी भरलेली नसेल किंवा नोंदणी नसेल, तर ते बक्षीसपत्र अवैध ठरू शकते. मात्र, दान करणाऱ्या व्यक्तीने आपल्या हयातीत स्वेच्छेने बक्षीसपत्र तयार केले आणि ते स्वीकारले गेले असल्यास ते कायदेशीरदृष्ट्या वैध मानले जाते.

अशा परिस्थितीत दान करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर बक्षीसपत्र रद्द करता येत नाही, हे महत्त्वाचे लक्षात घेणे आवश्यक आहे. दरम्यान, अनेकांना असा प्रश्न पडतो की तोंडी बक्षीसपत्र चालते का ? तर याविषयी पण कायद्यात काही महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे.

तोंडी बक्षीस पत्र हे कायदेशीररित्या ग्राह्य धरले जात नाही. तोंडी बक्षीसपत्राला कोणताही कायदेशीर आधार नाही. म्हणून बक्षीसपत्र हे नेहमी लेखी स्वरूपात, योग्य स्टॅम्प ड्युटीसह आणि नोंदणीकृत असणे आवश्यक आहे अन्यथा बक्षीस पत्र द्वारे हस्तांतरित झालेल्या मालमत्तेचा व्यवहार रद्द होऊ शकतो.

दरम्यान बक्षीस पत्राची नोंदणी झाल्यानंतर मूळ दस्तावेज प्राप्तकर्त्याकडे असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा अशा प्रकारचे व्यवहार ग्राह्य धरले जाणार नाहीत.