Property Rights : मालमत्ताधारकाला आपली मालमत्ता स्वायत्तपणे वापरण्याचा अधिकार असतो, मात्र अनेकदा शेजाऱ्यांसोबत मालमत्तेच्या सीमारेषेवरून वाद निर्माण होतात. विशेषतः जेव्हा शेजारी आपल्या प्लॉटच्या दिशेने खिडकी किंवा गेट उघडतात, तेव्हा हा प्रश्न अधिक गंभीर होतो.
कायद्यानुसार, कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्याच्या मालमत्तेत अतिक्रमण करण्याचा अधिकार नाही. शेजाऱ्याने आपल्या मालमत्तेकडे खिडकी किंवा गेट काढले, तर त्यामुळे त्याला कोणताही कायदेशीर हक्क मिळत नाही.

हा प्रकार अतिक्रमण म्हणून ओळखला जातो आणि त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार मालमत्ताधारकाला आहे. भारतीय कायद्यात स्पष्ट उल्लेख आहे की, मालमत्तेचा हक्क केवळ जमिनीपुरता मर्यादित नसून त्या जागेच्या हवाई क्षेत्रावरही असतो.
याचा अर्थ असा की, शेजाऱ्याने जर आपल्या जागेच्या वरील हवाई क्षेत्रात कोणतेही बांधकाम केले, जसे की बाल्कनी वाढवणे, छप्पर पुढे काढणे किंवा झाडांच्या फांद्या आपल्या प्लॉटकडे वाढू देणे, तर तो अतिक्रमणाचा प्रकार ठरतो.
गुवाहाटी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, कोणत्याही व्यक्तीला आपल्या मालमत्तेच्या हवाई क्षेत्रावरही अधिकार आहे. जर शेजाऱ्याने या हद्दीत अतिक्रमण केले, तर त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येते.
अशाच एका प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने देखील महत्त्वाचा निर्णय दिला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीच्या मालमत्तेवर शेजाऱ्याच्या झाडाच्या फांद्या अतिक्रमण करत होत्या.
न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले की, मालमत्ताधारकाला या झाडाच्या फांद्या कापण्याचा पूर्ण हक्क आहे. जर शेजारी अतिक्रमण करत असेल, तर सर्वप्रथम त्याला समज द्यावी आणि अतिक्रमण हटवण्यास सांगावे.
जर तो ऐकत नसेल, तर स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. तरीही अतिक्रमण कायम राहिल्यास, न्यायालयात याचिका दाखल करून अतिक्रमण हटवण्याची मागणी करता येते.
अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण हटवले जाते आणि मूळ मालमत्ताधारकाचा हक्क अबाधित राहतो. त्यामुळे अशा घटनांमध्ये योग्य कायदेशीर उपाययोजना करणे आवश्यक आहे.