Property Rights : आपल्या देशात संपत्तीवरून मोठ्या प्रमाणात वाद-विवाद होत असतात. संपत्तीच्या विवादामुळे अनेकदा कुटुंबात भांडणे होतात आणि अशा प्रकरणात संपत्तीचा वाद हा न्यायालयात जातो. काही वेळी कुटुंबात संपत्तीच्या कारणांमुळे होणाऱ्या वादात खुन सुद्धा पडतात. पण जर संपत्ती विषयक कायद्यांची माहिती असेल तर संपत्तीवरून होणारे वादविवाद कमी होऊ शकतात.
दरम्यान आज आपण संपत्तीच्या कायद्यामधील अशाच एका महत्त्वाच्या तरतुदीची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण ज्या तरतुदीची माहिती पाहणार आहोत त्यातून कोणत्या मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळत नाहीत? याबाबत आपणास कल्पना येणार आहे.
खरंतर भारतात मुलांना आणि मुलींना समान अधिकार देण्यात आले आहेत. वडिलांच्या संपत्तीत देखील मुलांना आणि मुलींना समान अधिकार असतात. पण, काही प्रकरणांमध्ये मुलींना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळत नाहीत.
अशातच गेल्या काही दिवसांमध्ये अनेकांच्या माध्यमातून मुलींना कोणत्या परिस्थितीत आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यामुळे आज आपण याच प्रश्नाचे कायदे तज्ञांनी दिलेले उत्तर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळत नाहीत
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदू उत्तर अधिकारी कायदा लागू होण्याआधी जर वडीलांचे निधन झाले असेल तर अशा प्रकरणांमध्ये मुलींना वडिलांच्या संपत्तीत अधिकार सांगता येत नाही. म्हणजे 1956 च्या आधी जर वडिलांचा मृत्यू झाला असेल तर अशा प्रकरणांमध्ये मुलीला तिच्या वडिलांच्या संपत्तीत वारस म्हणून दावा करता येत नाही. पण, अशा प्रकरणांमध्ये त्या काळातील प्रचलित कायद्यानुसार संपत्तीचे वाटप केले जाते, ज्यामध्ये मुलींना वारस म्हणून गृहित धरलं जात नाही.
जर समजा वडिलांच्या नावे असणारी प्रॉपर्टी किंवा मालमत्ता गुन्हेगारी प्रकरणात किंवा कायदेशीर प्रकरणात अडकलेली असेल तर अशा संपत्तीवर मुलींना दावा ठोकता येत नाही. सदर संपत्तीच्या प्रकरणात सुरू असणारे वाद निकाली निघाल्यानंतर मुलींना संपत्तीवर दावा करता येतो.
जर समजा वडिलांच्या नावे असणारी संपत्ती ती त्यांनी स्वतः कमावलेली असेल म्हणजेच वडिलोपार्जित नसेल, स्वतःच्या कष्टाने कमावलेली असेल तर अशा प्रकरणांमध्ये वडिलांच्या संपत्तीवर मुलींना दावा करता येत नाही. वडील त्यांना हवे असल्यास ती संपत्ती मुलींना देऊ शकतात किंवा मग ती संपत्ती त्यांना देऊ शकत नाहीत.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जर वडिलांनी मृत्यूपूर्वी मृत्युपत्र किंवा इच्छापत्र तयार केलेले असेल आणि त्यामध्ये त्यांच्या नावे असणारी संपत्ती त्यांनी त्यांच्या मुलाला किंवा इतर अन्य व्यक्तीला दिली असेल तर अशा प्रकरणात देखील मुलींना वडिलांच्या संपत्तीवर अधिकार राहत नाही.