Pune Expressway News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पुणे ते शिरुर असा प्रवास करतानाही पुणेकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून आगामी काही वर्षात पुणे ते शिरूर हा प्रवास वेगवान होणार आहे.
सध्या पुणे ते शिरूर दरम्यान चा प्रवास दोन ते अडीच तासांमध्ये होतोय. पण येत्या पाच वर्षात हा प्रवास केवळ ४५ मिनिटांत पूर्ण करता येणे शक्य आहे. कारण की यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाने पुणे – छत्रपती संभाजी नगर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग प्रकल्प आणि सध्याच्या पुणे – छत्रपती संभाजी नगर महामार्ग सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे.

दरम्यान सुधारणा प्रकल्पअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे – शिरुर उन्नत रस्त्याचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ५४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम केले जाणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यात २०० किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे काम होणार आहे.
सध्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून दीड – दोन महिन्यांत निविदा प्रक्रिया अंतिम करून येत्या आठ महिन्यात कामास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पुढील चार वर्षांत या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करून अंदाजे २०३० मध्ये हा रस्ता वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
हा रस्ता वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर पुणे – शिरूर अंतर ४५ मिनिटांत पार करता येणार आहे. मात्र, या अतिजलद प्रवासासाठी टोल म्हणजे पथकर द्यावा लागणार आहे, अन टोल बाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. नुकत्याच दोन दिवसांपूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासाठी केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग मंत्रालय २००८ पथकर धोरण लागू करण्याचा निर्णय झाला.
पुणे – छत्रपती संभाजी नगर प्रवास अतिजलद करण्यासाठी पुणे – छत्रपती संभाजी नगर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग बांधण्यासह सध्याच्या पुणे – छत्रपती संभाजी नगर महामार्ग सुधारणा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतला होता. मात्र गेल्या वर्षी सध्याचा महामार्ग सुधारणा प्रकल्प महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाकडे देण्यात आला आहे.
त्यानुसार याच्या पहिल्या टप्प्यात ५४ किमी लांबीचा पुणे – शिरुर उन्नत रस्ता बांधण्यात येणार आहे. या रस्त्यांच्या बांधकामासाठी काही महिन्यांपूर्वी निविदा मागविण्यात आल्या आहेत. सहा मार्गिकेच्या आणि ७५१५ कोटी रुपये खर्चाच्या या कामासाठीच्या निविदा १ एप्रिलला खुल्या करण्यात येणार होत्या. मात्र आता या निविदेस १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हा प्रकल्प बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर म्हणजेच बांधा-वापरा-हस्तांतरीत करा तत्वावर राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचा खर्च वसूल करण्यासाठीच आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महामार्गावर पथकर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरेतर, या रस्त्यासाठी राज्य सरकारचे पथकर धोरण लागू होत असल्याने भविष्यात हलक्या वाहनांसह अन्य काही वाहनांना पथकर लागू होणार नव्हता.
त्यामुळे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाने पुणे – छत्रपती संभाजी नगर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाला केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग मंत्रालय २००८ पथकर धोरण लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार नुकताच हा प्रस्ताव मान्य करून या महामार्गाला केंद्राचे पथकर धोरण लागू करण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता पुणे – शिरुर उन्नत रस्ता आणि शिरुर – छत्रपती संभाजी नगर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग खुला झाल्यास सर्व प्रकारच्या वाहनांना पथकर मोजावा लागणार आहे. उन्नत रस्ता प्रकल्पाच्या निविदेत आता बदल करून १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे.
येत्या महिन्याभरात निविदा खुल्या करून त्या अंतिम करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करून प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी किमान आठ महिन्यांचा कालावधी लागेल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. काम सुरू झाल्यापासून ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास चार वर्षांची मुदत देण्यात येणार आहे.
त्यामुळे हा उन्नत रस्ता २०३० पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन महामार्गासह सध्या महामार्गावरील उन्नत रस्ते वाहतूक सेवेत दाखल झाल्यास पुणे – शिरुर प्रवास अतिजलद होणार आहे. नक्कीच या प्रकल्पामुळे पुणे ते शिरूर हा प्रवास वेगवान होणार असून पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.