Pune Flyover : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर पुण्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. पुणे शिक्षणाचे माहेरघर म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. मात्र अलीकडील काही वर्षांमध्ये शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आपल्या पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठा बिकट झालाय.
हाच प्रश्न सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असून याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून सांस्कृतिक राजधानीतील एका महत्त्वाच्या भागात सहापदरी उड्डाणपूल विकसित करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

खरे तर पुणे – सोलापूर महामार्गावर अलीकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यावर रामबाण उपाय म्हणून महामार्गावर सहापदरी उड्डाणपूल उभारला जाणार आहे. दरम्यान, या महामार्ग प्रकल्पावर उभारल्या जाणाऱ्या सहा पदरी उड्डाणपुलाला आता एक महत्त्वाची मंजुरी प्राप्त झाली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाचा पायाभूत समितीच्या माध्यमातून या सहापदरी उड्डाणपुलाच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, आज आपण पुणे सोलापूर महामार्गावर उभारला जाणारा हा सहा पदरी उड्डाणपूल प्रोजेक्ट नेमका कसा आहे ? याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार उड्डाणपुल ?
पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या शहरादरम्यानचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. पुणे – सोलापूर महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता भैरोबा नाल्यापासून ते यवतपर्यंत नवा सहा पदरी उड्डाणपूल तयार होणार आहे.
या उड्डाणपुलाचा रूट भैरोबा नाला पुढे हडपसर आणि त्यापुढे यवत असा राहणार अशी माहिती प्रशासनाकडून समोर आली आहे. हा नवा सहा पदरी उड्डाणपूल 39 किलोमीटर लांबीचा राहणार असून याच्या प्रस्तावाला राज्य शासनाच्या पायाभूत समितीकडून नुकतीच मान्यता मिळाली असल्याने आता या प्रकल्पा च्या कामाला गती मिळणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत समितीची बैठक झाली होती या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय झाला. या भैरोबा नाला ते यवत उड्डाणपूल प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर जून 2025 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मान्यता मिळाली.
एवढेच नाही तर या भागातील सध्याचा रस्ता रुंद करून तो देखील सहापदरी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे भैरोबानाला ते यवतपर्यंतचा जवळपास 40 किलोमीटरचा प्रवास हा सुपरफास्ट होईल. साहजिकच या निर्णयानंतर पुणे – सोलापूर प्रवासालाही गती मिळणार आहे.
खरंतर जेव्हा हा प्रस्ताव समोर आला तेव्हा उड्डाणपूल हडपसर ते यवत असा तयार करण्याचा निर्णय झाला. मात्र नंतर हा उड्डाणपूल हडपसर ऐवजी हडपसरच्या मागे म्हणजेच भैरोबा नाल्यापासून सुरू करावा आणि यवतपर्यंत राहू द्यावा अशी मागणी उपस्थित झाली आणि यानुसार आता सुधारित प्रस्तावाला मान्यता मिळाली.
यामुळे पुलाची लांबी साडेचार किलोमीटर ने वाढली आहे अर्थात आता 39 किलोमीटर लांबीचा हा पूल राहणार आहे. यासाठी 262 कोटी रुपयांच्या खर्चाला आधीच सरकारकडून मान्यता सुद्धा मिळालेली आहे.
याचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून केले जाणार आहेत. हा प्रकल्प बांधा वापरा आणि हस्तांतरित करा म्हणजेच बीओटीवर तयार होणारा प्रकल्प आहे. यामुळे याचे काम जलद गतीने होईल अशी आशा आहे.













