Pune Flyover News : गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. पुण्यातही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे गेल्या काही वर्षांच्या काळात पूर्ण झाली आहेत तर काही कामे अजूनही प्रस्तावित आहेत. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्ते विकासाचे अनेक प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.
यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणजेच पुणे रिंग रोडचा प्रकल्प. दरम्यान, आता लवकरच पुण्याला आणखी एका नव्या रस्ते प्रकल्पाची भेट मिळणार आहे. पुण्याला पुणे ते शिरूर दरम्यानच्या 54 किलोमीटर लांबीच्या बहुमजली उड्डाणपुलाची भेट मिळणार आहे.

पुणे ते शिरूर दरम्यान 54 किलोमीटर लांबीचा बहुमजली उड्डाणपूल विकसित केला जात असून या प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. या प्रकल्पासाठी नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात 7,515 कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली आहे.
यामुळे आता या प्रकल्पाला चांगला वेग येईल अशी आशा आहे. खरंतर नगर रस्त्यावर म्हणजेच पुणे-अहिल्यानगर महामार्गावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. कारण असे की या महामार्गावर विदर्भ, मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्रात ये-जा करणारी वाहने, तसेच रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहत व अष्टविनायक दर्शनासाठी येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
या मार्गावरून दररोजच्या वाहनांची संख्या सुमारे दीड लाखांपेक्षा जास्त आहे. दरम्यान वाहनांची संख्या दररोज वाढतच आहे. वाहन संख्या जलद गतीने वाढत आहे अन दुसरीकडे सध्याचा मार्ग हा अपुरा पडतोय. यामुळे या मार्गावर वाघोली, लोणीकंद, कोरेगाव भीमा, शिक्रापूर, सणसवाडी, रांजणगाव, कारेगाव, सरदवाडी, शिरूर भागात सतत वाहतूक कोंडीचा प्रश्न भेडसावत आहे.
याच वाहतूक कोंडीवर उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती. दरम्यान हीच बाब विचारात घेऊन आता पुणे ते शिरूर दरम्यान बहुमजली उड्डाणपूल विकसित करण्यात येणार आहे. यासाठी आता जवळपास साडेसात हजार कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली असून यामुळे या प्रकल्पाच्या कामाला नक्कीच चालना मिळणार आहे.
दरम्यान पुण्यातील या बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे ते शिरूर हे अंतर फक्त 80 मिनिटात कापता येणार आहे. सध्या पुणे ते शिरूर दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जवळपास अडीच तासापर्यंतचा वेळ खर्च करावा लागतोय. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ 80 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे.