Pune Metro : पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी शहरात मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. शहरात सध्या दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत आणि या मार्गांना पुणेकरांच्या माध्यमातून अद्भुत असा प्रतिसाद सुद्धा मिळतोय.
दुसरीकडे शहरातील काही भागांमध्ये लवकरात लवकर मेट्रो सुरु होणे अपेक्षित असून याच अनुषंगाने आता पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो सुरू आहे.

तर दुसरीकडे या मेट्रो मार्गांचा विस्तारही केला जात आहे. अशातच आता लोणावळ्यापर्यंत मेट्रो सुरु झाली पाहिजे अशी मागणी जोर धरत असून या अनुषंगाने प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू झाला आहे.
लोणावळ्यापर्यंत मेट्रो धावायला हवी !
पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या विस्तार गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात झाला असून याच अनुषंगाने लोणावळ्यापर्यंत मेट्रो सुरू झाली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उपस्थित करण्यात आली आहे.
निगडी ते लोणावळा असा नवा मेट्रो मार्ग तयार झाला पाहिजे आणि या मेट्रो मार्गासाठी डीपीआर म्हणजेच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केली आहे.
मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी याबाबतचे निवेदन सुद्धा दिले आहे. त्यांनी पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले असल्याची माहिती संबंधितांकडून प्राप्त झाली आहे.
लोणावळ्यापर्यंत मेट्रो सुरु करण्याची मागणी का ?
चिखले यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, मावळ हा भाग पुणे आणि पिंपरी चिंचवड नजीकचा एक वेगाने विकसित होणारा भाग आहे.
येथून विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक वर्ग दररोज मोठ्या प्रमाणावर पुणे व पिंपरीकडे प्रवास करत असतो. यामुळे या भागातील नागरिकांसाठी पिंपरी ते भक्ती-शक्ती, निगडी मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे.
मात्र देहूरोड, तळेगाव, वडगाव, कामशेत व लोणावळा हा सुद्धा भाग जलद गतीने विकसित होत असून येथील लोकसंख्या देखील अधिक वाढली आहे. आगामी काळात ही लोकसंख्या आणखी वाढणार आहे. परिणामी या भागातील नागरिकांसाठी मेट्रो आवश्यक आहे.
यामुळे निगडी ते लोणावळा असा मेट्रो मार्ग सुरू करण्याची मागणी पुढे आली आहे. दरम्यान जर या मागणीवर सकारात्मक निर्णय झाला तर या भागातील शैक्षणिक, व्यावसायिक आणि दळणवळणाच्या दृष्टीने हा मार्ग फारच गेमचेंजर ठरणार अशी आशा आहे.
यामुळे प्रवासाचा वेळ, खर्च कमी होईल तसेच वाहतूककोंडीही टळेल असे काही जाणकार लोकांकडून सांगितले जात आहे. हेच कारण आहे की, आगामी बजेटमध्ये हा मार्ग समाविष्ट करून लवकरात लवकर डीपीआर तयार करून मंजुरी द्यावी,
अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उपस्थित करण्यात आली आहे. यामुळे आता या मागणीवर प्रशासनाकडून नेमका काय निर्णय घेतला जातो ? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.