पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात तयार होणार आणखी 2 नवे मार्ग ! कसे असणार 31 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग ? पहा..

Published on -

Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघावा यासाठी शहरात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत तसेच मेट्रोची कामे देखील युद्ध पातळीवर केली जात आहेत.

शहरात सध्या पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू असून याच मेट्रो मार्गांचा महा मेट्रो कडून विस्तार देखील केला जात आहे.

पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या मेट्रो मार्गांना प्रवाशांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत असून यामुळे पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्गांचा विस्तार केला जात असून आता मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम देखील सुरू होणार आहे.

मेट्रोच्या याच दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत विकसित केल्या जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी आता हालचाली तीव्र झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील खराडी ते खडकवासला आणि नळ स्टॉप ते माणिकबाग या मेट्रो मार्गावरील स्थानकांसाठी ‘रचनाकार सल्लागार समिती’साठी खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

महत्त्वाची बाब अशी की या समितीसाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) निविदा मागविण्यास सुद्धा सुरुवात केली आहे. म्हणजेच या समितीची स्थापना लवकरच होणार आहे आणि त्यानंतर या प्रकल्पांच्या कामाला आणखी वेग मिळणार आहे.

नक्कीच यामुळे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांच्या कामाला वेग मिळणार आहे. दरम्यान आता आपण महा मेट्रो कडून विकसित केल्या जाणाऱ्या या दुसऱ्या टप्प्यातील दोन्ही मेट्रो मार्गाच्या बाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसे असणार मेट्रो मार्ग ?

खडकवासला-खराडी मार्ग : हा मेट्रो मार्ग 25.51 किलोमीटर लांबीचा राहणार असून यावर 22 स्थानके विकसित होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या जवळपास 26 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गावर खडकवासला, दळवेवाडी, नांदेड सिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे चौक, राजाराम पूल, देशपांडे उद्यान, स्वारगेट (उत्तर), सेव्हन लव्हज चौक,

पुणे कटक मंडळ, रेसकोर्स, फातिमानगर, रामटेकडी, हडपसर फाटा, मगरपट्टा (दक्षिण), मगरपट्टा मध्य, मगरपट्टा (उत्तर), हडपसर रेल्वे स्थानक, साईनाथनगर, खराडी चौक आणि खराडी बायपास हे मेट्रो स्टेशन विकसित होणार आहेत. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीतून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नळ स्टॉप ते वारजे माणिकबाग : हा दुसऱ्या टप्प्यातील दुसरा मेट्रोमार्ग 6.12 किलोमीटर लांबीचा राहील आणि यावर एकूण सहा स्थानके विकसित केली जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या दुसऱ्या मेट्रो मार्गावर माणिकबाग, दौलतनगर, वारजे, डहाणूकर कॉलनी, कर्वे पुतळा आणि नळ स्टॉप ही 6 स्थानके विकसित केली जाणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe