Pune Metro News : भारतीय निवडणूक आयोगाने दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक घेतली जाणार असे संकेत दिले आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीचे पडघम आत्तापासूनच वाजू लागले आहेत. सत्ताधारी पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्वसामान्यांसाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत.
मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सरकारी कामकाज युद्धपातळीवर सुरु आहे. विविध विभागात गेल्या काही महिन्यांपासून अटकलेल्या फाईल क्लिअर केल्या जात आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र आणि राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजनांची घोषणा करून राज्यातील जनतेवर कृपावर्षाव केला जात आहे. असाच कृपावर्षाव पुण्यातील जनतेवर देखील झाला आहे.
पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब अशी ओळख प्राप्त असणारे शहर. या शहराचा महाराष्ट्रातील सुवर्ण त्रिकोणात समावेश होतो. हे शहर राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावते.
मात्र गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या कॉमन बनली आहे. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी रस्ते आणि लोकल तसेच मेट्रोचे जाळे विकसित करण्यावर शासनाचा विशेष भर आहे. पुणे मेट्रो बाबत बोलायचं झालं तर सध्या स्थितीला शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत.
पीसीएमसी ते स्वारगेट या मेट्रो लाईन 1 चा पीसीएमसी ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या मेट्रो लाईन 2 चा म्हणजेच एक्वा मेट्रो लाईन चा वनाज ते रामवाडी हा संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी सुरू आहे. दरम्यान आता या दोन्ही मेट्रोमार्गांचे विस्तारीकरण होणार आहे.
यातील मेट्रो लाईन 1 च्या विस्तारा संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्वारगेट ते कात्रज या भूमिगत विस्तारित मेट्रो लाईन प्रकल्पाला मोदी सरकारने मंजुरी दिली आहे.
हा विस्तारित मार्गाचा प्रकल्प मेट्रो लाईन 1 बी या नावाने ओळखला जाणार आहे. आता आपण हा विस्तारित मेट्रो मार्ग नेमका कसा राहणार, या मार्गामुळे कोणत्या भागातील नागरिकांना फायदा होणार या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा राहणार विस्तारित मार्ग?
या विस्तारित मेट्रो मार्गाची लांबी 5.46 km एवढी राहणार आहे. या मार्गावर तीन स्थानके राहणार आहेत आणि तिन्ही स्थानके भूमिगत राहतील. या मेट्रो मार्ग प्रकल्पामुळे मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजी नगर आणि कात्रज हा परिसर जोडला जाणार आहे. या प्रकल्पासाठी 2954.53 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा संपूर्ण प्रकल्प 2029 अखेरपर्यंत पूर्ण होणार असा दावा होत आहे.
केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे पुण्यातील मेट्रो मार्गाचे जाळे आणखी विस्तारणार असून यामुळे शहरातील नागरिकांचा प्रवास सध्याच्या तुलनेत अधिक जलद आणि गतिमान होणार आहे. तथापि या मेट्रो मार्गाने प्रवास करण्यासाठी आणखी पाच वर्ष वाट पहावी लागणार आहे.