Pune Metro News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. पुण्यातील जे नागरिक मेट्रोने प्रवास करतात त्यांच्यासाठी ही बातमी विशेष खास ठरणार आहे. खरंतर देशात 14 मार्च 2025 रोजी होळीचा सण साजरा होणार आहे. यामुळे सध्या संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
परंतु, आपल्या राज्यात उद्या अर्थातच 13 तारखेला होळीचा सण साजरा होईल अन 14 तारखेला राज्यात धुळवड साजरा केली जाणार आहे. पण, कोकणात तर आत्तापासूनच शिमग्याची धूम पाहायला मिळत आहे. दरम्यान याच होळी सणाच्या धामधुमीत पुण्यातील नागरिकांसाठी एक कामाची बातमी समोर आली आहे.

धुळवड सणानिमित्त अर्थातच शुक्रवारी मेट्रोच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला असून याबाबतची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून दिली आहे.
मेट्रोच्या वेळापत्रकातील बदल नेमका कसा?
पुण्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवर दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांनी अर्थात 14 मार्च 2025 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दुपारी 3 या वेळेत पुणे मेट्रोची प्रवासी सेवा बंद राहणार आहे. मात्र, त्यानंतर मेट्रोची सेवा पुन्हा एकदा पूर्ववत होणार आहे.
या दिवशी दुपारी 3 वाजता सेवा पुन्हा सुरू होणार असून, रात्री 11 वाजेपर्यंत नियमित वेळापत्रकानुसार मेट्रो धावणार असल्याची बातमी हाती आली आहे. मेट्रो प्रशासनाने यात्रेकरू व प्रवाशांनी ही माहिती लक्षात घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.
नक्कीच जर तुम्हालाही या दिवशी पुणे मेट्रो ने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला या बदललेल्या वेळापत्रकानुसारच आपल्या प्रवासाचे नियोजन या ठिकाणी करावे लागणार आहे.
होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यामुळे या दिवशी सकाळच्या वेळेत मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पर्यायी वाहतुकीचा विचार करावा. पुणे मेट्रोच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्स आणि वेबसाईटवरही यासंबंधी माहिती अपडेट केली जाईल.