Pune Metro News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. जर तुम्ही पुणे मेट्रोने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. कारण की, पुणे मेट्रोचे जाळे आता आणखी वाढणार आहे. पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाकडून पुणे शहरातील काही महत्त्वाच्या मेट्रो मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे.
खरंतर, सद्यस्थितीला पुण्यात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे. विशेष बाब अशी की, शहरातील आणखी काही भाग मेट्रोने जोडले जाणार आहेत. कारण की, पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाच्या योजनांना केंद्र सरकारकडून गती मिळावी यासाठी आता युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

या कामाचा विडा स्वतः केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उचलला असून त्यांनी या अनुषंगाने केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची नुकतीच भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. मोहोळ यांनी खट्टर यांची राजधानी दिल्ली येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे.
या दोन मेट्रो मार्गांना पीआयबीची मंजुरी
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या दोन मार्गांवर मेट्रोचे टप्पे प्रस्तावित करण्यात आले आहेत. या दोन्ही विस्तारित मेट्रो मार्गांबाबत बोलायचं झालं तर यासाठी महामेट्रोकडून सविस्तर विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.
महत्वाची बाब म्हणजे या प्रस्तावांना राज्य सरकारची मंजुरी सुद्धा मिळाली आहे. दरम्यान या प्रकल्पांना राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर मार्च महिन्यात पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाने या दोन्ही प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे. 11 मार्च रोजी पीआयबी म्हणजेच पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाकडून या दोन्ही प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
पीआयबीकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता या दोन्ही प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणे आवश्यक असून याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर यावा अशी मागणी सुद्धा मोहोळ यांनी केली आहे.
मेट्रोच्या आणखी 2 मार्गांना मंजुरी मिळणे आवश्यक
याचबरोबर, खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला आणि नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग हे आणखी दोन विस्तारित मेट्रो मार्ग महामेट्रो कडून प्रस्तावित करण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे याचेही डीपीआर रेडी आहेत आणि राज्य सरकारकडून यांना प्राथमिक मंजुरी सुद्धा देण्यात आली आहे.
परंतु या विस्तारित मेट्रोमार्ग प्रकल्पांना अजून पब्लिक इन्वेस्टमेंट बोर्डाकडून मान्यता मिळालेली नाही. पण लवकरच या दोन्ही मार्गांना पीआयबीकडून मान्यता मिळू शकते आणि म्हणूनच या प्रस्तावांना देखील केंद्र सरकारकडून लवकरात लवकर संमती मिळवण्यासाठी मोहोळ यांनी खट्टर यांच्या सोबत चर्चा केली असल्याचे वृत्त हाती आले आहे.
खरेतर पुणे शहरात मेट्रोचे व्यापक जाळे उभारण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे आणि केंद्राचा हा संकल्प सत्यात उतरला आणि प्रस्तावित मार्गांना मंजुरी मिळाली तर शहरातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री मोहोळ यांची खट्टर यांच्याशी झालेली चर्चा सकारात्मक होती आणि लवकरच केंद्र सरकारकडून यावर निर्णय येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.