Pune Metro News : पुणे शहरात सध्या मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. सध्या शहरात महामेट्रोकडून दोन मेट्रो मार्ग सुरू करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो धावत असून या मेट्रो मार्गांना पुणेकरांच्या माध्यमातून भरभरून असा प्रतिसाद सुद्धा मिळत आहे.
या मेट्रो मार्गामुळे पुणेकरांचा प्रवास हा फारच सुपरफास्ट झाला आहे. दुसरीकडे, येत्या काही दिवसांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग देखील प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर पूर्ण केला जात असून आतापर्यंत या प्रकल्पाचे जवळपास 82% पर्यंतचे काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांनी हा सुद्धा मार्ग सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू होणार आहे.
अशातच, आता महा मेट्रो कडून सुरु करण्यात आलेल्या मेट्रो मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर, सध्या पुण्यातील नागरिकांसाठी मेट्रोने तिकीटविरहित आणि सवलतीच्या दरात प्रवास करता यावा यासाठी एक पुणे मेट्रो कार्ड ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
या कार्डमुळे पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट काढण्याची गरज भासत नाही. हे कार्ड अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. मेट्रोने प्रवास करताना प्रवाशांना फक्त हे कार्ड मशीन समोर पकडावे लागते आणि त्यानंतर मग प्रवाशांना ऑटोमॅटिक एन्ट्री मिळते.
या कार्डला रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या रिचार्ज मधूनच ठराविक अंतराचे तिकीट सुद्धा कापले जाते. म्हणजेच हे कार्ड असल्यास पुणे मेट्रोने प्रवास करताना तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडक्यांमध्ये उभे राहण्याची गरज भासत नाही.
हे कार्ड प्रवाशांना 118 रुपयांना उपलब्ध करून दिले जात आहे. आजही सर्वसामान्य नागरिकांना हे कार्ड 118 रुपयांना मिळत आहे. मात्र, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुणे मेट्रो प्रशासनाने या कार्डच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे.
या कार्डसाठी महिलांना आता मोठी सवलत देण्यात आली आहे. 118 रुपयांचे हे कार्ड महिलांना आता फक्त 20 रुपयात मिळणार आहे. यामुळे पुण्यातील महिलांनी पुणे मेट्रो प्रशासनाच्या या ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.