Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत असून यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसतोय. दरम्यान शहरातील हीच वाहतूक कोंडी कायमची दूर व्हावी या अनुषंगाने शहरात मेट्रोचे मार्ग विकसित केले जात आहेत. सध्या शहरात मेट्रोचे दोन मार्ग सुरू आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो सुरु असून या मेट्रो मार्ग प्रकल्पांमुळे शहरातील नागरिकांचा प्रवास फारच वेगवान झाला असून यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या बऱ्यापैकी कमी झाली आहे.

दुसरीकडे या मेट्रो मार्गांच्या विस्तारीकरणाच्या कामाला देखील गेल्या काही दिवसांमध्ये वेग आला आहे. अशातच आता शहरातील दोन नव्या मेट्रो मार्ग प्रकल्पाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांना आता गती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील खराडी ते खडकवासला आणि नळ स्टॉप ते माणिकबाग या मेट्रो मार्गावरील स्थानकांसाठी ‘रचनाकार सल्लागार समिती’साठी खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
विशेष बाब अशी की, त्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन अर्थातच (महामेट्रो) निविदा मागविण्यास सुरुवात केली आहे. खरेतर शहरात सध्या जे मेट्रो मार्ग सुरू आहेत त्या पहिल्या टप्प्यातील मार्गांचा विस्तार अंतिम टप्प्यात आहे.
पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्गांच्या विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असून येत्या काही वर्षात पहिला टप्पा पूर्णपणे कार्यान्वित होईल आणि शहरातील बहुतांशी भाग मेट्रो ने जोडला जाणार आहे. अशी सारी परिस्थिती असतानाच आता दुसऱ्या टप्प्यातील पाच मार्ग नव्याने प्रस्तावित करण्यात आले आहेत.
त्यापैकी खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी या 25.51 किलोमीटर अंतराच्या मार्गावर 22 स्थानके विकसित केली जाणार आहेत, तर नळ स्टॉप ते वारजे-माणिकबाग 6.12 किलोमीटर मार्गावर सहा स्थानके निश्चित करण्यात आली आहेत.
या दोन्ही मार्गांवरील स्थानकांची रचना भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून आणि इतर दळणवळण य़ंत्रणा परिस्थितीनुरूप सुनिश्चित करण्यासाठी ‘मेट्रो’ने खासगी रचनाकार सल्लागार समितीची नेमणूक करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत.
अर्थातच आता या मेट्रोप्रकल्पांच्या कामाला गती मिळणार असून आगामी काळात या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल आणि त्यानंतर शहरातील दळणवळण व्यवस्था आणखी मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय.