पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! शहराला मिळणार दोन नवीन मेट्रो मार्ग, महाराष्ट्र राज्य शासनाची मान्यता 

Published on -

Pune Metro News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुण्याला आणखी दोन नव्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार असून या दोन्ही मेट्रो मार्गांना अलीकडेच मंजुरी मिळाली आहे. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दोन्ही मेट्रो मार्गांना फडणवीस सरकारकडून मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील मेट्रो मार्गांचे जाळे आणखी स्ट्रॉंग होणार आहे.

पुणेकरांसाठी वाहतूक सुलभतेच्या दिशेने हा एक मोठा निर्णय घेण्यात आलाय असं आपण म्हणू शकतो. पुणे मेट्रो टप्पा २ अंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन उपमार्गिकांना राज्य मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होणे आधीच हा निर्णय घेण्यात आला होता. मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत या दोन्ही मेट्रो मार्गांना मान्यता देण्यात आली. ही माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीये.

या बैठकीचे अध्यक्षस्थान स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. या दोन्ही उपमार्गिका मिळून सुमारे १६ किलोमीटर लांबीच्या असतील आणि त्यामध्ये १४ उन्नत स्थानकांचा समावेश राहणार आहे. एकूण ५,७०४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, या पूर्णतः उन्नत मेट्रो प्रकल्पांची अंमलबजावणी महामेट्रोमार्फत केली जाणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत मेट्रो मार्ग बोगद्याद्वारे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत नेण्याचे निर्देश दिले. तसेच विमानतळ परिसरात रस्ते, मेट्रो आणि पार्किंगचे मल्टिलेव्हल इंटेग्रेशन विकसित करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

या दोन उपमार्गिकांमुळे हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि सासवड या वेगाने वाढणाऱ्या उपनगरांना मेट्रो सेवेशी जोडले जाणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा लाभ मिळेल. अजित पवार यांनी यामुळे लाखो प्रवाशांचा वेळ वाचेल आणि प्रदूषणावरही नियंत्रण मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, पुण्यातील अन्य मेट्रो प्रकल्पही वेगाने सुरू आहेत. पुणे चिंचवड–निगडी ४.४ किमी उन्नत मेट्रो प्रकल्प जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहे. तर स्वारगेट–कात्रज अंडरग्राऊंड मेट्रो मार्च २०२९ पर्यंत आणि वनाझ–चांदणी चौक व रामवाडी–वाघोली कॉरिडोर जुलै २०२९ पर्यंत पूर्ण होणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी खराडी–हडपसर–स्वारगेट–खडकवासला या मेट्रो प्रकल्पासाठी तत्काळ भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयांमुळे पुणे मेट्रोचे जाळे पूर्वेकडे आणि उपनगरांपर्यंत विस्तारले जाईल, ज्यामुळे पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासात मोठा बदल होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News