Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असून यामुळे सर्वसामान्य पुणेकर हैराण झाले आहेत. हीच वाहतूक कोंडीची समस्या निकाली काढण्यासाठी शासन अन प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे ही देखील बाब नाकारून चालणार नाही.
मात्र सध्या तरी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून आतापर्यंत केल्या जाणाऱ्या उपाययोजना वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी अपुऱ्या ठरल्या आहेत. पण भविष्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी कायमची निकाली निघणार असे चित्र आहे. कारण की आता पुणे शहरात मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे.

आतापर्यंत पुण्याचा जो भाग मेट्रोने कनेक्ट करण्यात आला नव्हता तो सुद्धा भाग आता मेट्रोने कनेक्ट होणार आहे. पुण्यातील दोन महत्त्वाच्या मेट्रोमार्ग प्रकल्पांना नुकतीच मंजुरी देण्यात आली असून या प्रकल्पांमुळे पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या कायमची निकाली निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मित्रांनो पुण्यातील पूर्वेकडील वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न म्हणून आता शहरातल्या पूर्व भागातही मेट्रोचे जाळे विस्तारले जाणार आहे. कारण की, हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्टेशन या दोन मेट्रो मार्गांना महापालिकेने नुकतीच मंजुरी दिली आहे. हे दोन्ही मेट्रो मार्ग 17 किलोमीटर लांबीचे असून या मेट्रोमार्गांच्या प्रकल्प आराखड्याला महापालिकेच्या मुख्य सभेने मंजुरी दिली असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.
या दोन्ही मेट्रो मार्गांसाठी 5704 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा खर्च केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून केला जाणार आहे. महापालिकेने या मेट्रो मार्ग प्रकल्पासाठी येणारा खर्च केंद्र आणि राज्य शासन आणि उचलावा असे या प्रस्तावात म्हटले आहे. खरेतर, पूर्व भागातील हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्टेशन या प्रस्तावित मेट्रो मार्ग प्रकल्पांसाठी आतापर्यंत डीपीआर तयार केला जात होता.
नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुम्टा) बैठकीत या प्रकल्पाचा डी पी आर हा पुणे महानगर विकास प्राधिकरण आणि महा मेट्रो यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार या डीपीआर चे काम सुरू होते. दरम्यान हा डीपी आर तयार झाल्यानंतर हा डीपीआर महापालिकेला सादर करण्यात आला. दरम्यान आता याचे डीपीआरला महापालिकेच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे. आता आपण हे दोन मेट्रो मार्ग नेमके कसे आहेत याचा एक थोडक्यात आढावा घेणार आहोत.
कसे आहेत मेट्रो मार्ग?
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर ते लोणी काळभोर हा मार्ग 11.5 किमीचा राहणार आहे. तर हडपसर ते सासवड रेल्वे स्टेशन हा मार्ग 5.57 किमीचा असणार आहे. हडपसर ते लोणी काळभोर यादरम्यान 10 मेट्रो स्टेशन उभारण्यात येणार आहेत. यापैकी 6 स्टेशन हे महापालिका हद्दीमध्ये असणार आहेत. हडपसर ते सासवड रेल्वे स्टेशनदरम्यानचे 2 मेट्रो स्टेशन हे महापालिका हद्दीमध्ये राहणार आहेत.
या दोन्ही मार्गिकांसाठीच्या खर्चाबाबत बोलायचं झालं तर या दोन्ही प्रकल्पासाठी 5 हजार 704 कोटी इतका खर्च येणार आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी 20 टक्के निधी देईल म्हणजेच केंद्र सरकारचा 20% आणि राज्य सरकारचा 20% असा चाळीस टक्के निधी सरकारकडून उपलब्ध होणार आहे व उर्वरित 60 टक्के निधी हा कर्ज काढून उभारण्यात येणार आहे.
नक्कीच या दोन्ही प्रकल्पांमुळे पुण्यातील पूर्वेकडील वाहतूक कोंडी देखील बऱ्यापैकी कमी होणार आहे. मात्र या प्रकल्पाला सध्या फक्त महापालिकेकडून मंजुरी मिळाली आहे. अजून या प्रकल्पासाठी अनेक मंजूऱ्या मिळवाव्या लागणार आहेत. म्हणून या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात कधी सुरू होणार आणि कधी या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार यावरच पूर्वेकडील वाहतूक कोंडीचे समाधान अवलंबून राहणार आहे.