Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. दरम्यान ऑक्टोबर 2025 मध्ये पुण्यातील एक महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्ग सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची बातमी समोर आली आहे. सध्या पुणे शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे.
हे दोन्ही मेट्रो मार्ग महा मेट्रोकडून संचालित केले जात आहेत. पण आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित होणारा एक बहुचर्चित मेट्रो मार्ग पुणेकरांच्या सेवेत येणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ने जाहीर केले आहे की, हिंजवडी ते शिवाजीनगरला जोडणारी बहुप्रतिक्षित मेट्रो लाईन आता येत्या काही महिन्यांनी पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. हा मेट्रो मार्ग ऑक्टोबर 2025 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान हा मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर या परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसत आहे. परंतु हा मेट्रो मार्ग सुरू होण्यासाठी आणखी आठ महिने वाट पहावी लागणार आहे. आता आपण हा मेट्रो मार्ग नेमका कसा आहे आणि या मेट्रो मार्गाचे काम कुठपर्यंत पोहोचले आहे याबाबतचा एक आढावा घेऊयात.
कसा आहे मेट्रो मार्ग
हा बहुचर्चित मेट्रो मार्ग प्रकल्प 23.3 किलोमीटरचा आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे एकूण 82 टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे मुख्य पायाभूत सुविधांचे काम, डक्ट बसवणे आणि रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.
तसेच या मार्गांवरील 23 स्थानकांवर एस्केलेटर बसवणे, ट्रॅफिक सिग्नल, इलेक्ट्रिकल सिस्टीम आणि किरकोळ दुरुस्ती यासारखी अतिरिक्त कामे सुद्धा अंतिम टप्प्यात आली आहेत.
दरम्यान या प्रकल्पामधील सर्व प्रलंबित कामे आणि चाचणी सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल, ज्यामुळे ऑक्टोबरमध्ये या मार्गांवर ऑपरेशन सुरू होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
या मेट्रो मार्गामुळे शहराचा मध्यवर्ती भाग अर्थातच शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे. या परिसरातील वाहतूक कोंडी या मेट्रो मार्ग प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर म्हणजेच पीपीपी तत्त्वावर पूर्ण केला जात आहे. या मार्गामुळे शिवाजीनगर ते हिंजवडी हा प्रवास फक्त 25 मिनिटात पूर्ण होईल असे म्हटले जात आहे.
या मार्गावर क्वाड्रॉन, इन्फोसिस फेज दोन, डोहलर, विप्रो, पल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, एनआयसीएमएआर, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, भारतीय कृषी संशोधन संस्था, सकाळनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर आणि दिवाणी न्यायालय अशी 23 स्थानके विकसित होत आहेत.