Pune Mhada News : पुण्यात घर असावं असं स्वप्न पाहिलंय का? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून (म्हाडा) ने नागरिकांना हजारो घर उपलब्ध करून दिली आहेत.
Mhada ने तब्बल सव्वाचार हजार घरांची लॉटरी जाहीर केली आहे. यासाठी अर्ज विक्री प्रक्रिया गेल्या काही काळापासून सुरू आहे. आता येत्या चार ते पाच दिवसांत याची सोडत निघणार आहे.

यासाठी म्हाडाचे प्रयत्न सुरू आहे. या कालावधीत आचारसंहिता लागू झाल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घेऊनच सोडत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
या सोडतीसाठी दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या गृहनिर्माण सोडतीला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल २ लाख १५ हजार ८४७ अर्ज प्राप्त झाले आहेत.
या सर्व अर्जांची सध्या सखोल पडताळणी सुरू असल्यामुळे सोडत काढण्यास काहीसा विलंब झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. अर्जांची संख्या अपेक्षेपेक्षा अधिक असल्याने तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ लागत असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या सोडतीसाठी अर्ज व अनामत रक्कम स्वीकारण्याची प्रक्रिया ११ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर ठेवण्यात आली होती.
मात्र, नागरिकांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अडचणी येत असल्याने आणि इतर कारणांमुळे अर्जासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. अखेरीस अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती.
प्रत्येक अर्जासाठी ७०८ रुपये अर्ज शुल्क आणि २० हजार रुपये अनामत रक्कम ठेवण्यात आली होती. त्यानुसार अर्जदारांकडून एकूण ४४६ कोटी ९७ लाख ५९ हजार ६७६ रुपये इतकी रक्कम म्हाडाकडे जमा झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज आणि निधी जमा झाल्याने ही सोडत पुणे मंडळासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, पुढील आठवड्यात जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोडतीच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो.
मात्र, ही बाब नागरिकांच्या हिताची असल्याने आणि विशेष स्वरूपाची सोडत असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन सोडत जाहीर करण्यात येईल, असेही आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन सोडत लवकरात लवकर पार पाडण्यावर म्हाडाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.













