Pune Mumbai Travel : तुम्ही पण पुणे – मुंबई दरम्यान प्रवास करता का? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे लवकरच या दोन्ही महानगरांमधील प्रवास वेगवान होणार आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि राज्य राजधानी दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी मुंबई – पुणे एक्सप्रेसवेवर मिसिंग लिंकचे काम हाती घेण्यात आली असून आता याच प्रकल्पाबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.
या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे आणि येत्या काही दिवसात हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीला या प्रकल्पाचे 93 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित 7 टक्के काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे.

या प्रकल्पांतर्गत 181 मीटर उंची असणारा देशातील सर्वाधिक उंच दरी पुल विकसित करण्यात आला आहे. पुलाचे काम फारच आव्हानात्मक होते आणि आता हे काम पूर्ण झाले असल्याने लवकरच हा प्रकल्प सर्वसामान्यांच्या सेवेत येणार आहे आणि यामुळे पुण्याहून मुंबई आणि मुंबईहून पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. दरम्यान या प्रकल्पासाठी आता नवीन डेडलाईन समोर आली आहे.
या तारखेला खुला होऊ शकतो मार्ग
मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम 92 ते 93 टक्के पूर्ण झाले आहे आणि उर्वरित कामाची गती पाहता हा प्रकल्प मे 2026 पर्यंत पूर्णतः बांधून तयार होणार आहे. मे महिन्यापर्यंत मिसिंग लिंक वरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा महत्त्वाचा उद्देश म्हणजेच घाट सेक्शन मधील 13.3 किलोमीटर लांबीचे अंतर कमी करणे. यासाठी घाटात दोन महाकाय बोगदे तयार करण्यात आले आहेत.
यातील एक बोगदा 1.68 किलोमीटर लांबीचा आहे आणि दुसरा बोगदा 8.87 किलोमीटर लांबीचा आहे. पावसाळ्यातील आव्हानांमुळे या प्रकल्पाच्या कामावर परिणाम झाला होता मात्र सर्व आव्हानांचा सामना करत हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आलाय.
या प्रकल्पाचे काम 2019 मध्ये सुरू झाले त्यावेळी या प्रकल्पाचा खर्च 6690 कोटी रुपये एवढा गृहीत धरण्यात आला होता मात्र आता हा खर्च थेट साडेसात हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. खोपोली एक्झिट ते कुसगाव या दरम्यानचा प्रवास मिसिंग लिंक प्रोजेक्ट मुळे अधिक वेगवान होणार आहे.













