Pune-Nagar Expressway : काल शुक्रवारी अर्थातच 6 सप्टेंबर 2024 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची अतिशय महत्त्वाची बैठक संपन्न झाली. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे-अहमदनगर महामार्गावरील येरवडा ते शिरूर दरम्यान सहा पदरी उड्डाणपूल तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार असा विश्वास व्यक्त होऊ लागला आहे. खरे तर गेल्या काही वर्षांपासून नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

या मार्गाने प्रवास करताना येरवडा ते शिरूर दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. यामुळे या भागातील रस्त्याचे विस्तारीकरण झाले पाहिजे अशी मागणी नागरिकांच्या माध्यमातून सातत्याने उपस्थित केली जात आहे.
दरम्यान, याच मागणीच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नगर रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी येरवडा ते शिरुर हा रस्ता सहापदरी करण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करावा अशा सूचना दिल्या होत्या.
याच सूचनांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार केला होता. दरम्यान आता या प्रस्तावाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. यानुसार आता सध्याच्या पुणे-शिरुर-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा केली जाणार आहे.
आता येरवडा ते शिरूर दरम्यान 53 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल विकसित होणार आहेत. याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केले जाणार असून यासाठी तब्बल 7515 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान आता या प्रकल्पाला राज्य शासनाकडून मान्यता मिळाली आहे.
या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या निधीला मंजुरी सुद्धा मिळाली आहे. यामुळे याच्या कामाला गती मिळणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निकाली निघेल अशी आशा आहे.
शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे पुणे-अहमदनगर मार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो, लाखों प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सध्या या मार्गाने प्रवास करताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय, यामुळे अपघाताची देखील भीती असते.
पण भविष्यात येरवडा ते शिरूर दरम्यान 53 किलोमीटर लांबीचा उड्डाणपुल विकसित होणार आहे, अन यामुळे ही समस्या दूर होऊन या भागातील कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. यामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे.