Pune Nagar Railway News : येत्या काही दिवसांनी उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत आणि याचं उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढणार आहे. दरवर्षी पुणे ते नागपूर या रेल्वे मार्गावर उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीत रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत असते आणि हीच संभाव्य अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून या हंगामातील उन्हाळी सुट्ट्यांमध्ये या मार्गावर विशेष गाडी चालवण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे.
ही विशेष गाडी अहिल्यानगर मार्गे चालवली जाणार असल्याने जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते नागपूर दरम्यान सुरू केल्या जाणाऱ्या या विशेष एक्सप्रेस ट्रेनला अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर, बेलापूर आणि कोपरगाव या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे.

पुणे ते नागपूर दरम्यान गाडी क्रमांक ०१४६९/०१४७० आणि ट्रेन क्रमांक ०१४६७/०१४६८ या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. दरम्यान, आता आपण याच विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक
पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक सुपरफास्ट एसी स्पेशल (ट्रेन क्रमांक ०१४६९) पुणे येथून ०८.०४.२०२५ ते २४.०६.२०२५ या कालावधीत चालवली जाणार आहे. या कालावधीत ही स्पेशल ट्रेन दर मंगळवारी पुणे रेल्वे स्थानकावरून १५.५० वाजता सोडली जाणार आहे आणि ही ट्रेन दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
या काळात या गाडीच्या एकूण १२ फेऱ्या होणार आहेत. यामुळे पुणे ते नागपूर असा प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे, गाडी क्रमांक ०१४७० ही एसी साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेन ०९.०४.२०२५ ते २५.०६.२०२५ या काळात नागपूर रेल्वे स्थानकावरून चालवले जाणार आहे.
या कालावधीत ही गाडी नागपूरहून दर बुधवारी सकाळी ८.०० वाजता सोडली जाणार आहे आणि त्याच दिवशी ही ट्रेन रात्री ११.३० वाजता पुणे येथे पोहोचणार आहे. या गाडीच्याही एकूण १२ फेऱ्या राहणार आहेत. म्हणजेच या स्पेशल ट्रेनच्या पुणे ते नागपूर अशा १२ आणि नागपूर ते पुणे अशा १२ फेऱ्या म्हणजे एकूण २४ फेऱ्या होणार आहेत.
शिवाय गाडी क्रमांक ०१४६७ पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ०९.०४.२०२५ ते २५.०६.२०२५ या कालावधीत चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी पुणे येथून दर बुधवारी १५.५० वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता ही गाडी नागपूरला पोहोचणार आहे.
तसेच गाडी क्रमांक ०१४६८ साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल १०.०४.२०२५ ते २६.०६.२०२५ या कालावधीत चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी दर गुरुवारी नागपूरहून सकाळी ८.०० वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पुणे येथे पोहोचेल. या सुद्धा विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या २४ फेऱ्या होणार आहेत.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
पुण्याहून विदर्भात आणि विदर्भातून पुण्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या विशेष एक्सप्रेस ट्रेन फायद्याच्या ठरणार आहेत. या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.