Pune Nashik Railway News : पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्राच्या सुवर्ण त्रिकोणातील दोन महत्त्वाची शहरे. पण या दोन्ही शहरात दरम्यान अजूनही थेट रेल्वे मार्ग विकसित करण्यात आलेला नाही. यामुळे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला असून आता याच प्रकल्पात बदल करण्याचा मोठा निर्णय झाला आहे. आधी हा प्रकल्प संगमनेर मार्गे प्रस्तावित होता मात्र आता या प्रकल्पात बदल झाला आहे.
या रेल्वे मार्गामध्ये जुन्नर तालुक्यातील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) प्रकल्प येत असल्याने या प्रकल्पाच्या रूटमध्ये बदल करण्याचा मोठा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला आहे. आता संगमनेरऐवजी हा मार्ग शिर्डी मधून जाणार आहे.
जीएमआरटीचे स्थलांतर करून हा प्रकल्प आधी प्रस्तावित असणाऱ्या मार्गानेच होणार असे म्हटले जात होते. पण केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने जीएमआरटीचे स्थलांतर होणार नसून पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलला जाईल असे स्पष्ट केले आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकल्पाचे घोडे अडले आहे. हा प्रकल्प केंद्राच्या मंजुरीविना गेले काही महिने अडकून होता. अशातच आता या प्रकल्पाचा मार्ग बदलणार असल्याचे वृत्त हाती आले आहे.
जीएमआरटी प्रकल्प हा भारतासाठीच नाही तर भारताव्यतिरिक्त इतर २३ देशांसाठी महत्वाचे वैज्ञानिक केंद्र आहे. अशा परिस्थितीत, या केंद्राचे स्थलांतर करणे म्हणजे भारतातील सर्वांत शक्तीशाली केंद्राची क्षमता कमी करण्यासारखे होईल.
यामुळे जीएमआरटी प्रकल्पाला धक्का न लावता पुणे-नाशिक नवीन रेल्वेमार्गाचा नवा आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. त्यानुसार हा रेल्वेमार्ग पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक असा राहणार आहे.
म्हणजे हा रेल्वे मार्ग शिर्डीवरून जाणार आहे. यामुळे आता या रेल्वे मार्गाचे अंतर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते नाशिक हा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे.
सध्या पुणे ते नाशिक दरम्यान थेट रेल्वे मार्ग नाही यामुळे या प्रकल्पाचा या दोन्ही शहरांमध्ये नागरिकांना फायदा होणार आहे. पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर या तिन्ही जिल्ह्याच्या एकात्मिक विकासासाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरू शकतो असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.