पुणे – नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत महत्त्वाचे अपडेट, पुन्हा रेल्वे मार्गाचा रूट बदलणार, रेल्वेमंत्र्यांसमोर मांडला नवा प्रस्ताव !

Pune Nashik Railway : पुणे आणि नाशिक हे दोन्ही शहरे मध्य महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे आहेत. महाराष्ट्राच्या सुवर्ण त्रिकोणातील अर्थात मुंबई, पुणे आणि नाशिक या सुवर्ण त्रिकोणातील या दोन महत्त्वाच्या महानगरादरम्यान अजूनही थेट रेल्वेमार्ग विकसित झालेला नाही.

यामुळे या दोन्ही महानगरादरम्यान थेट रेल्वे मार्ग झाला पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून उपस्थित केली जात होती. यानुसार रेल्वे मंत्रालयाने पुणे संगमनेर नाशिक असा रेल्वे मार्ग प्रस्तावित केला होता. या प्रस्तावित रेल्वे मार्गाचे अलाइनमेंट महाराष्ट्र रेल्वे विकास महामंडळाकडून तयार करण्यात आले होते.

यामुळे पुणे ते नाशिक असा थेट रेल्वे मार्ग प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आशा होती. नाशिक-पुणे रेल्वेमार्ग सिन्नर-संगमनेरमार्गेच प्रस्तावित असल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना जलद गतीने पुणे ते नाशिक असा प्रवास करता येणार होते.

महत्त्वाची बाब म्हणजे या प्रस्तावित रेल्वे मार्गाचा संगमनेर व आजूबाजूच्या परिसरातील विकासाला मोठा फायदा होणार होता. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी अधिसूचना काढून संबंधित जमिनींचे संपादनही करण्यात आले होते.

पण रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित मार्गाचे अलाइनमेंट बदलण्याचा निर्णय घेतला असून आता हा मार्ग पुणतांबा शिर्डी मार्गे तयार करण्याचा निर्णय झालाय. स्वतः केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या निर्णयाची सभागृहाला माहिती दिली.

महाराष्ट्र रेल्वे विकास महामंडळाने तयार केलेले अलाइनमेंट रद्द करून साईनगर शिर्डी-नाशिक असा मार्ग निश्चित करण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत या नव्या निर्णयाची माहिती दिली मात्र नवीन निर्णय जाहीर झाल्याबरोबर या परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधींकडून विरोध सुरू झाला. 

शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला. त्यांनी याबाबत लोकसभेत अनेक प्रश्न उपस्थित केलेत. स्वतः शिंदे गटाचे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी सुद्धा या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आणि आपण हा मार्ग संगमनेर मधूनच व्हावा यासाठी प्रयत्न करणार असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील खासदारांच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नुकतीच भेट घेतली असून सरकारने जाहीर केलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा याबाबत शिष्टमंडळाने रेल्वे मंत्र्यांना एक महत्त्वपूर्ण निवेदन सुद्धा दिले आहे.

या भेटीदरम्यान शिष्टमंडळाकडून हा प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे असेही यावेळी नमूद केले. दरम्यान खासदारांच्या शिष्टमंडळाने या मार्गासाठी नवीन प्रस्ताव रेल्वे मंत्र्यांना दिला आहे.

खासदारांच्या शिष्टमंडळाकडून पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नाशिक ते शिर्डी अशी नवी मार्गिका टाकून ती पुढे सध्याची चाकण औद्योगिक वसाहत व नवीन पुणे-अहिल्यानगर या मार्गाला जोडावी, अशा आशयाचा नवा प्रस्ताव रेल्वेमंत्र्यांपुढे मांडण्यात आला आहे.

केंद्रातील सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयावर तोडगा म्हणून या प्रस्तावाकडे पाहिले जात आहे. पण या प्रस्तावाला पुणे जिल्ह्यात विरोध होण्याची शक्यता नाकारून चालणार नाही. यामुळे आता रेल्वे मंत्र्यांकडून खासदारांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या प्रस्तावावर खरच काही सकारात्मक निर्णय घेतला जाणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.