नाशिक-अहिल्यानगर-पुणे रेल्वेमार्ग बदलल्याने कोणते तोटे सहन करावे लागतील ? वाचा…

Pune – Nashik Railway : नाशिक ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरंतर या दोन महानगर दरम्यान सध्या कोणताच थेट रेल्वे मार्ग अस्तित्वात नाही. यामुळे प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान प्रवाशांची हीच अडचण लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून या दोन्ही महानगरा दरम्यान नवा रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.

आता नाशिक–पुणे दरम्यानचा बहुचर्चित आणि दीर्घकाळ चर्चेत असलेला रेल्वेमार्गबाबत लोकसभेतून महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. आता हा मार्ग प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने हालचाली गतीमान झाल्या आहेत.

पण प्रस्तावित मार्गात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने महत्त्वपूर्ण बदल केला आहे. दरम्यान या बदलामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाशिक आणि संगमनेर परिसरात मार्गात करण्यात आलेल्या बदलामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत हा शासनाचा महत्त्वकांक्षी रेल्वेमार्ग आता आहिल्यानगर–शिर्डीमार्गे नेण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. केंद्रातील सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे गेल्या अनेक दशकांपासून संगमनेरमार्गे रेल्वेची वाट पाहणाऱ्या स्थानिकांचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे.

दरम्यान आता आपण हा रेल्वे मार्ग संगमनेर ऐवजी शिर्डी मार्गे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने याचे काय तोटे होऊ शकतात याचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत.

शिर्डीमार्गे रेल्वेमार्ग विकसित झाल्यास होणारे तोटे  

संगमनेरमधील स्थानिक विकासाच्या संधींवर घाला येऊ शकतो. हा निर्णय संगमनेर मधील स्थानिक विकास खुंटवणारा आहे. ह्या मार्ग बदलाचा तोटा नाशिककरांनाही सहन करावा लागणार आहे. शिर्डीमार्गे पुण्याला जाण्यासाठी नाशिककरांना मोठा वळसा घालावा लागू शकतो.

रेल्वेच्या या निर्णयामुळे नाशिक–पुणे अंतर वाढणार असून प्रवासाचा कालावधीही वाढण्याची शक्यता आहे. संगमनेरमार्गे असलेला आधीचा मार्ग नाशिक आणि सिन्नर तालुक्यातील 23 गावांमधून जाणार होता. त्यामुळे या गावांच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा होती.

मात्र नव्या मार्गामुळे ही संधी हिरावल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. संगमनेर ऐवजी शिर्डी वरून ही रेल्वे धावली तर रेल्वे मार्गाच्या खर्चात पण वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे नाशिक सहित संगमनेर व आजूबाजूच्या परिसरातील विकासाला मोठा फटका बसू शकतो.

त्यामुळे रेल्वेच्या नव्या निर्णया विरोधात आता अहिल्यानगर आणि नाशिक मधून आवाज बुलंद केला जातोय. संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी सुद्धा आपण स्वतः केंद्राकडे हा मार्ग संगमनेर वरूनच झाला पाहिजे अशी आग्रही मागणी लावून धरणार असे सांगितले आहे.

खरेतर, नाशिक–पुणे रेल्वेमार्गाचे आतापर्यंत तीन वेळा सर्वेक्षण झाले होते आणि प्रत्येक वेळी संगमनेरमार्गे जाणारा मार्ग अधिक व्यवहार्य ठरला होता. याच मार्गावर आधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) 2020 मध्ये मंजूर झाला होता.

महारेलमार्फत नाशिक, आहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये भूसंपादन प्रक्रिया देखील सुरू झाली होती. पण अचानक जुलै 2025 मध्ये शिर्डीमार्गे नव्या DPR ला मंजुरी देण्यात आल्याने स्थानिक पातळीवर संताप वाढला आहे.

या संदर्भात आमदार सत्यजित तांबे यांनी तीव्र भूमिका घेत मार्ग बदल रद्द करण्याची मागणी सुद्धा उपस्थित केली आहे. तसेच राजकारण बाजूला ठेवून संगमनेर–अकोले–सिन्नर–कोपरगाव परिसरातील सर्व लोकप्रतिनिधींनी एका मंचावर येणे गरजेचे असल्याचेही आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

योग्य मार्ग तीन वेळा सर्वेक्षणात सिद्ध झाल्यानंतरही तो बदलला का, याचा खुलासा झाला पाहिजे, असे पण तांबे यांनी म्हटले आहे. तसेच राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने सार्वजनिक सुनावणी घेण्याचीही मागणी त्यांनी केली.