Pune New Bridge : पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते विकासाच्या अनेक प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही रस्ते विकासाच्या अनेक प्रकल्पांची कामे सध्या सुरू आहेत आणि काही प्रकल्प प्रस्तावित आहेत. पुणे शहरात अनेक नवीन पूलांचे आणि उड्डाणपुलांची निर्मिती केली जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे काही उड्डाणपूल हे बहुमतली आहेत. यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीवर आगामी काळात नक्कीच तोडगा निघणार अशी आशा आहे. दरम्यान शहरातील काही जुने पूल जमीनदोस्त करून नवीन पूल विकसित करण्याच्या कामांना देखील वेग आला आहे.

शहरातील कोरेगाव पार्क भागातील रेल्वे मार्गावरील जुना आणि वाहतुकीसाठी धोकादायक ठरलेला साधू वासवानी पूल पाडून त्या जागी नवीन पूल उभारला जाणार असून आता याच प्रकल्पाबाबत एक नवीन अपडेट हाती आले आहे. खरे तर हा पूल पाडण्याचा निर्णय गेल्यावर्षीच झाला होता.
मात्र याच्या पाडकामात काही अडचणी येत होत्या, त्या अडचणी आता दूर झाल्या आहेत आणि म्हणूनच लवकरच या ब्रिजचे काम आता पूर्ण होणार आहे. पीएमसी म्हणजे पुणे महानगरपालिका येत्या काही दिवसांत हा जुना पूल हटवण्याचे काम सुरू करणार आहे.
विशेष तंत्रज्ञान आणि मोठ्या क्रेनच्या साहाय्याने केवळ 12 दिवसांमध्ये या पुलाचे पाडकाम पूर्ण होईल अशी माहिती समोर येत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कोरेगाव पार्क येथील रेल्वे मार्गावरील साधू वासवानी उड्डाणपूल बराच जुना झाला असून, तो वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे तांत्रिक अहवालात नमूद करण्यात आले होते.
त्यामुळे, महापालिकेने हा पूल पाडून त्या जागी नवीन, अधिक सुरक्षित आणि आधुनिक पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 83 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 2024-25 च्या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात या कामासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
जुन्या पुलाच्या खाली मध्यभागी खांब होता, मात्र नवीन पूल बांधताना असा खांब न उभारता ‘ओपन वेब गर्डर’ पद्धतीचा वापर केला जाणार आहे. या नवीन पुलाची लांबी 54 मीटर असेल. नक्कीच या ब्रिजचे काम पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे वाहतुकीला चालना मिळणार आहे.