Pune New Express Highway : धुळे नंदुरबार जळगाव सहित संपूर्ण खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जनता कामानिमित्ताने पुण्याला जाते. पुणे शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि आयटी हब म्हणून ओळखले जाते.
शिक्षण, नोकरी अन् छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांसाठी अनेक लोक पुण्यात येतात. पर्यटनासाठी देखील पुणे संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. छत्रपती संभाजी नगर आणि जळगाव जिल्ह्यातूनही दररोज हजारो लोक पुण्याला जातात.

दरम्यान याच नागरिकांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे कारण की सरकारकडून आता एक नवीन एक्सप्रेस हायवे तयार केला जाणार असून या नव्या हायवेमुळे जळगाव ते पुणे हा प्रवास भविष्यात फक्त तीन तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे.
हा नवा एक्सप्रेस हायवे पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान तयार होईल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः या महामार्गाची घोषणा केली आहे.
पुणे – छत्रपती संभाजी नगर प्रवास होणार वेगवान
पुण्याहून संभाजीनगरला आणि संभाजीनगरहून पुण्याला प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. पण या दोन्ही महानगरांमधील प्रवास फारच आव्हानात्मक झाला आहे.
सध्या स्थितीला पुण्याहून छत्रपती संभाजी नगरला रस्ते मार्गाने जायचे असल्यास प्रवाशांना जवळपास सहा ते साडेसहा तासांचा वेळ लागतो. मात्र नवा एक्सप्रेस हायवे डेव्हलप झाल्यानंतर हा प्रवासाचा कालावधी अवघ्या दोन तासांवर येणार असल्याचा दावा केला जातोय.
आता या महामार्गामुळे जळगाव ते पुणे हा प्रवास कसा वेगवान होणार तर गडकरी यांनी समृद्धी महामार्ग म्हणजेच मुंबई नागपूर एक्सप्रेस वे जळगावला जोडण्याचा निर्णय घेतला आहे. जून महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता.
या बैठकीत जळगावहून छत्रपती संभाजी नगरला आणि पुण्याला तसेच मुंबईला जाणे कसे सोयीचे होऊ शकते याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. सध्या जळगाव वरून अजिंठा सिल्लोड मार्गे छत्रपती संभाजी नगरला जावे लागते आणि यासाठी दोन ते अडीच तासांचा वेळ लागतो.
मात्र जळगाव – संभाजीनगर हा प्रवास एक तासांवर आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत आणि या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच हा रस्ता थेट समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे हा रस्ता समृद्धी महामार्गाला कनेक्ट होईल.
म्हणजेच भविष्यात जळगाव वरून छत्रपती संभाजीनगर हा प्रवास पूर्ण करण्यासाठी एक तास आणि पुढे छत्रपती संभाजीनगर वरून पुण्याला प्रवास करण्यासाठी दोन तास असे एकूण तीन तासात प्रवाशांना जळगाव ते पुणे हा प्रवास करता येईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. पुणे संभाजीनगर महामार्गासाठी जवळपास 16,320 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.













