Pune New Expressway : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुण्याला आता एक नवा हायटेक महामार्ग मिळणार आहे. खरे तर, आपल्या राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मोठमोठ्या रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे अंतिम टप्प्यात आहेत.
यात समृद्धी महामार्गाचा सुद्धा समावेश आहे समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा येत्या काही दिवसांनी सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा म्हणजेच इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू होणार आहे.

दुसरीकडे आता पुण्याला एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. पुणे ते बंगळूरू दरम्यान नवा आठपदरी ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे तयार केला जाणार आहे. यामुळे पुणे ते बेंगलोर दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. दरम्यान, आता याच नव्याने विकसित होणाऱ्या महामार्ग प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे.
काय आहेत डिटेल्स ?
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते बेंगलोर दरम्यान तयार केल्या जाणाऱ्या आठ पदरी ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे चा डीपीआर म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे हा डीपीआर ज्याला मराठीत सविस्तर प्रकल्प अहवाल असे म्हणतात तो आता मंजुरीसाठी पुढे पाठवण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हा अहवाल सुपूर्द करण्यात आला असून या अहवालाला मंजुरी मिळताच या प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन सुरू होणार आहे.
कधीपर्यंत पूर्ण होणार Expressway चे काम ?
पुणे ते बेंगलोर दरम्यान सध्या जो महामार्ग अस्तित्वात आहे त्याची लांबी 838 किलोमीटर इतकी असून आता या दोन्ही शहरादरम्यान ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे तयार केला जाणार आहे. या प्रकल्पाचे काम केंद्र शासनाच्या भारतमाला परियोजनेअंतर्गत पूर्ण होईल.
या अंतर्गत जो महामार्ग प्रकल्प विकसित होतोय तो 745 किलोमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड महामार्ग राहणार आहे. म्हणजे नवा महामार्ग प्रकल्प या दोन्ही शहरांमधील 93 किलोमीटरचे अंतर कमी करणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांचे जवळपास 4 ते 5 तास वाचणार आहेत, कारण यावर 120 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहने धावतील.
या प्रकल्पासाठी तब्बल 40 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. हा ग्रीनफील्ड कॉरिडोर भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 24 महिन्यांमध्ये म्हणजेच दोन वर्षात पूर्ण होईल असा दावा अधिकाऱ्यांकडून केला जातोय.
कसा असणार नवा महामार्ग ?
पुणे ते बेंगलोर दरम्यान तयार होणारा हा नवा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे सध्याच्या महामार्गापेक्षा फारच हायटेक राहणार आहे. नवा महामार्ग वारवे बुद्रुकपासून सुरू होईल. हा एक आठपदरी मार्ग असेल, पण हा संपूर्ण रस्ता डांबरी राहणार आहे. मुंबई ते नागपूर दरम्यानचा समृद्धी महामार्ग हा संपूर्ण काँक्रिटचा आहे.
पुणे-बेंगलोर महामार्गावर टोलनाक्यांपासून गावांमध्ये जाण्यास रस्ता राहणार आहे. या महामार्गालगत प्रसाधनगृहे, मुलांसाठी उद्याने, हॉटेल असतील. हा महाराष्ट्रातील पहिला असा महामार्ग ज्यावर विमानाची धावपट्टी तयार केली जाणार आहे. ही धावपट्टी इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये कामी येणार आहे.