Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न झाले आहेत. नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पुणे ते शिरूर या दरम्यान 56 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग विकसित होत आहे.
महत्त्वाची बाब अशी की यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न 100% कमी होईल आणि यासाठी साडेसात हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. पण या उन्नत महामार्गातून फिनिक्स मॉल ते खराडी बायपास हा चार किलोमीटर लांबीचा मार्ग वगळला गेला आणि यामुळे या भागातील नागरिकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली.

तसेच हा मार्ग फिनिक्स चौकातूनच करण्यात यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली. खरेतर हा मार्ग आधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित होणार होता. मात्र गेल्या वर्षी राज्यातील रस्त्यांची कामे जलद गतीने व्हावेत यासाठी एका नव्या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली.
गेल्यावर्षी राज्य शासनाने एमएसआयडीसी ची स्थापना केली आणि याच प्राधिकरणाकडे या मार्गाचे काम सोपवण्यात आले. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की पालिकेमार्फत खराडी बायपास चौकातून उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटर बांधण्याचे ठरले होते. या मार्गावरील विकासकामे ही पूर्णतः एनएचआयएच्या कामांमध्ये करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला होता.
मात्र, पुढे नवीन प्राधिकरणाची निर्मिती झाल्यानंतर हे काम नव्या प्राधिकरणाला म्हणजेच एम एस आय डी सी ला देण्यात आले. एमआयडीसी कडे हे काम सोपवल्यानंतर या मार्गाचे काम म्हणजेच फिनिक्स मॉल ते खराडी बायपास हे काम उन्नत महामार्गातून वगळण्यात आले होते.
मात्र उन्नत रस्त्याच्या कामात फिनिक्स मॉल ते खराडी बायपास या कामाचाही समावेश व्हावा अशी स्थानिकांची मागणी होती आणि यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा निवेदन देण्यात आले होते आणि आता हाच पाठपुरावा यशस्वी झाला असल्याचे बोलले जात आहे.
कारण की आता फिनिक्स मॉल ते खराडी बायपास या रस्त्याचे काम उन्नत मार्गात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या ठिकाणी आता एलिव्हेटेड पूल तयार करण्यात येणार अशी माहिती जाणकार लोकांकडून देण्यात आली आहे. यामुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
एकंदरीत, पुणे – नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे. या निर्णया अंतर्गत महानगरपालिकेच्या हद्दीतील फिनिक्स मॉल ते खराडीदरम्यान दुमजली उड्डाणपूल बांधण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे या चौकात होणारी वाहतूक कोंडी आता कमी होऊ शकते असा आशावाद व्यक्त केला जात आहे. म्हणजेच यादरम्यान चार किलोमीटर लांबीचा दुमजली उड्डाणपूल तयार होणार असून या कामामुळे या भागातील वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होणार आहे. यामुळे संबंधित नागरिकांच्या माध्यमातून शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.