Pune News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात अनेक मोठमोठ्या महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. महत्वाची बाब म्हणजे आजही राज्यात अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अशातच आता अहिल्यानगर व मराठवाड्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
नगर रस्त्यावर दिवसेंदिवस वाढणारी वाहतुककोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक नवीन प्रकल्प हाती घेतलाय. शिरूर-खेड-कर्जत असा नवीन महामार्ग तयार केला जाणार आहे.

मराठवाडा व अहिल्यानगर भागातून मुंबईकडे जाणारी वाहतूक यामुळे थेट कर्जतमार्गे मुंबईला जाणार आहे. परिणामी, नगरमार्गावरील तसेच पुणे-शिरूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होणार असा विश्वास व्यक्त होतोय.
दरम्यान आता या प्रकल्पाला गती देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात नुकतीच प्रकल्प सनियंत्रण कक्षाची बैठक घेतली. या बैठकीत अनेक अधिकारी उपस्थित होते. यावेळी पवार यांनी अधिकाऱ्यांना प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कसा असणार प्रस्तावित मार्ग?
सार्वजनिक बांधकाम विभाग 135 किलोमीटरचा रस्ता तयार करणार आहे. यामुळे मुंबईला जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होईल. हा प्रस्तावित मार्ग शिरूर-पाबळ-राजगुरूनगर-शिरवली-पाईट-वांद्रे-कर्जत असा राहील. हा मार्ग चार पदरी राहील.
पण पुढे हा मार्ग पनवेल-उरण मार्गाशी जोडला जाणार आहे. ह्या प्रकल्पासाठी जवळपास 12 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सुमारे 670 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. बीओटी तत्त्वावर या महामार्गाची उभारणी होईल.
या मार्गावर एकूण पाच बोगदे, सहा मोठे व 48 लहान पूल उभारले जाणार आहेत. नव्या महामार्गामुळे औद्योगिक क्षेत्राला चालना मिळेल तसेच कृषी उत्पादनांची जलद वाहतूक होईल. सध्या मराठवाड्यातून मुंबईला जाणाऱ्या वाहनांना चाकण-शिक्रापूर-तळेगावमार्गे प्रवास करावा लागतो.
चाकण व शिरूर येथील एमआयडीसीमुळे या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. या पार्श्वभूमीवर नव्या मार्गाची गरज अधोरेखित झाली आहे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणतात.
यामुळे देशांतर्गत सर्व प्रमुख कॉरिडॉर या शहराशी जोडण्याची तयारी केली जात आहे. हा नवीन प्रस्तावित मार्ग देखील याचाच एक भाग आहे. नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा मार्ग विकसित केला जातोय.